डॉ. अनिल दुधभाते यांचा ‘सिंहगड भूषण’ पुरस्काराने गौरव

पुणे – प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉ. अनिल दुधभाते यांना सामाजिक कार्यासाठी अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘सिंहगड भूषण’ हा पुरस्कार नुकताच प्रदान करुन गौरविण्यात आले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रवीण बाजीराव शिंदे आणि विकासनाना दांगट पाटील यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला. पश्चिम हवेलीमधील ग्रामीण भागातील दहा हजार विद्यार्थ्यांची मोफत नेत्रतपासणी डॉ. दुधभाते नेत्रालयातर्फे पार पडली होती.
डॉ. अनिल दुधभाते म्हणाले की, ज्यावेळी हवेलीतील दहा हजार विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी केली होती त्यावेळी यापैकी 1800 विद्यार्थ्यांना चष्माचा नंबर लागला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातील 600 विद्यार्थ्यांना माहीतच नव्हते की त्यांना दृष्टीदोष आहे. आम्ही तपासणी केल्यानंतर ही गोष्ट लक्षात आली अन्यथा पुढे जाऊन त्याचे गंभीर परिणाम (Lazy Eye) झाले असते. काही वेळा आयुष्यात असे क्षण येतात की आपण निवडलेल्या क्षेत्रात कार्य करत असल्याचा अभिमान वाटू लागतो. आपल्यामुळे कुणाच्या तरी आरोग्याची निगा राखली जात असेल, डोळ्यांना दृष्टी आणि चेहऱ्यावर हसू फुलत असेल तर एका नेत्रतज्ज्ञासाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट असते. हाच आनंद देशाचे भविष्य असणाऱ्या तब्बल दहा हजार विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी करून मला मिळाला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने 30 जून 2023 ते 22 सप्टेंबर 2023 या कालावधीत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. या पुरस्कारासाठी आणि नेत्रतपासणी शिबिरांचे आयोजन करण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे यावेळी डॉ. दुधभाते यांनी आभार मानले.

Leave A Reply

Translate »