‘मोहोळ यांच्या विजयाची औपचारिकता बाकी’ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : ‘मुरलीधर मोहोळ यांना निवडून आणण्यासाठी पुणेकरांमध्येच प्रचंड उत्साह आहे. पुणेकरांनीच ठरवले असल्यामुळे मोहोळ यांच्या विजयाची फक्त औपचारिकता बाकी आहे. त्यावर फक्त शिक्कामोर्तब व्हायचं आहे,’ असे सांगून ‘संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला मागच्या वेळेपेक्षा अधिक जागा मिळतील,’ असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला.
भारतीय जनता पक्षासह घटक पक्षांच्या महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी सकाळी पुणे लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. याप्रसंगी फडणवीस बोलत होते.

‘पुण्यात लोकांचे भाजप आणि महायुतीवर प्रेम आहे. महापौर म्हणून खूप चांगले काम केलेला उमेदवार आम्ही दिला आहे आणि जनता आमच्या पाठीशी आहे. दिवंगत गिरीशभाऊ बापट यांनी पुण्यात कार्यकर्त्यांचा अतिशय चांगला वारसा आम्हाला दिला आहे. त्यामुळे इथे मुरलीधर मोहोळ निवडून येतील याबद्दल आमच्या मनात शंका नाही,’ असेही ते म्हणाले.

‘जे ५४२ जागांमध्ये फक्त १० जागा उभ्या करतात, त्यांच्या जाहीरनाम्याला काय अर्थ आहे,’ अशा शब्दांत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार यांच्या जाहीरनाम्यावरही टीका केली

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, चेतन तुपे, सुनील टिंगरे, माजी आमदार योगेश टिळेकर, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, सुनील देवधर, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, मनसे नेते बाबू वागस्कर, राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहर अध्यक्ष दीपक मानकर, शिवसेनेचे शहर अध्यक्ष नाना भानगिरे, पिंपरी-चिंचवडचे भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, आरपीआयचे शहर अध्यक्ष संजय सोनावणे या वेळी उपस्थित होते.

सुमारे चार तास पदयात्रा सुरू होती. महर्षी धोंडो केशव कर्वे पुतळा, श्री मृत्युंजयेश्वर मंदिर, श्री दशभुजा गणपती मंदिर, नळस्टॉप मेट्रो स्टेशन, गरवारे महाविद्यालय, स्वातंत्र्यवीर स्मारक या मार्गे खंडोजीबाबा चौकात पदयात्रेचा जाहीर सभेने समारोप झाला. दरम्यान ठिकठिकाणी पदयात्रेचे जल्लोषात स्वागत झाले. फुलांचा वर्षाव आणि भव्य पुष्पहाराच्या माध्यमातून स्वागत केले गेले.

प्रचारसभा सुरू असताना महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुणे लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडे रवाना झाले.

आई-वडिलांचे आशिर्वाद घेऊन प्रारंभ…
अत्यंत उत्साही वातावरणात सकाळी कोथरूड येथील महर्षि कर्वे यांच्या पुतळ्यापासून मोहोळ यांच्या रॅलीला प्रारंभ झाला. तत्पूर्वी मोहोळ यांनी आई-वडिलांचे आशिर्वाद घेतले व ग्रामदेवता कसबा गणपतीला वंदन केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन केले. दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या कसब्यातील जनसंपर्क कार्यालयात असलेल्या प्रतिमेसही अभिवादन केले.

पुणेकरांनीच ठरवले असल्याने पुण्यात मोहोळ यांचा विजय सहज होईल. त्यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अनेक योजना पुण्यात राबवल्या आहेत. भविष्यातही त्यांची दूरदृष्टी पुणेकरांना एक चांगला खासदार निवडल्याची अनुभूती देईल, अशी खात्री वाटते.

  • देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय देवेंद्रजी यांच्या प्रेरणेने आज उमेदवारी अर्ज भरला. पुणेकरांची सेवा आजवर करत आलो आहेच. आता थोड्या व्यापक स्वरुपात ही सेवा करण्याची संधी पुणेकर देतील हा विश्वास आजची अलोट गर्दी पाहून निर्माण झाला आहे. त्यामुळे मी पुणेकरांचा उमेदवार आहे, पुणेकरच मला निवडून देतील.

  • मुरलीधर मोहोळ, उमेदवार, महायुती
    …………….

Leave A Reply

Translate »