देशाचा आगामी पंतप्रधान तिसऱ्या आघाडीचा असेल – हेमंत पाटील यांचा दावा

पुणे : देशात सध्या लोकसभा निवडणुकांचे वातावरण आहे. भाजप प्रणीत एनडीए आणि कॉँग्रेससह अन्य पक्षांची इंडिया आघाडी यांच्यात प्रामुख्याने लढत होणार असल्याचे बोलालले जात आहे. मात्र देशातील मूलभूत प्रश्न सोडविण्यात पंतप्रधान मोदींना अपयश आले आहे, कॉँग्रेसने 50 वर्षाहून अधिकाच्या सत्ताकाळात फारसे काम केले नाही यामुळे सामान्य मतदार देशात निर्माण झालेल्या तिसऱ्या आघाडी सोबत असून देशाचा पुढचा पंतप्रधान तिसऱ्या आघाडीचा असेल असा दावा इंडिया अगेंस्ट करप्शनचे  राष्ट्रीय अध्यक्ष, भारतिय जनविकास महाआघाडीचे नेतृत्व करणारे  हेमंत पाटील यांनी केला आहे. 

पुढे बोलताना हेमंत पाटील म्हणाले, देशपातळीवर एनडीए आणि इंडिया आघाडी या दोन प्रमुख आघाड्या दिसत असल्या तरी प्रत्येक राज्यात स्थानिक मुद्यांच्या प्रश्नांवर स्थानिक, प्रादेशिक पक्षांच्या आघाड्या निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण ताकदीनिशी उतरल्या आहेत, यामुळें देशात तिसरी आघाडी पहिल्या क्रमांकावर असल्याचे दिसून येत आहे. परिणामी येणाऱ्या लोकसभेत तिसरी आघाडी आपले बहुमत सिद्ध करेल आणि देशाचा पंतप्रधान हा तिसऱ्या आघाडीचा असेल असा विश्वास वाटतो. 

दरम्यान, देशाच्या पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी सक्षम नाहीत असे सांगताना हेमंत पाटील म्हणाले, देशात स्वातंत्र्यापासून कॉँग्रेसची सत्ता होती त्यांनीही अपेक्षित प्रगती केलेली नाही, मागील दहा वर्षांपासून मोदी देशातील सामान्य माणसांचे प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरले आहेत. भाजप, कॉँग्रेस हे भांडवलदारांचे आणि प्रस्थापितांचे नेतृत्व करणारे पक्ष आहे. त्यांच्या ध्येय धोरणामुळे देशात गरीब आणि श्रीमंत दरी अधिकच वाढत चालली आहे. वाढती महागाई रोखणे, बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे काम तिसरी आघाडीच करू शकेल असे पाटील यांनी सांगितले. 

तसेच, देशात 7 टप्यात लोकसभेची निवडणूक आहे. आपला देश वैविध्यपूर्ण भौगोलिक परिस्थिती असलेला आहे, यामुळे सर्वच राजकीय पक्षांना मतदारांपर्यंत पोहचण्यास पुरेसा कालावधी मिळणार आहे, निवडणूक आयोगाने मतदान टप्याचे योग्य नियोजन केल्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगांचे आम्ही आभार मानतो असेही हेमंत पाटील म्हणाले.

Leave A Reply

Translate »