मुळीक लागले मोहोळांच्या प्रचाराला, फडणवीसांची शिष्टाई यशस्वी झाली

पुणे : पुणे लोकसभेसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहोळ यांनी प्रचाराची पहिली फेरी देखील पूर्ण केली. शहर भाजपमधील बहुतांश नेते त्यांच्यासोबत दिसत असताना उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक राहिलेले माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक मात्र पक्षीय कार्यक्रमापासून दूर होते. आता महाराष्ट्र भाजपचे सर्वेसर्वा असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मुळीक बंधूंची नाराजी दूर झाली असून ते प्रचारात सहभागी होताना दिसत आहेत. त्यामुळे फडणवीसांची शिष्टाई यशस्वी झाल्याचं बोलले जात आहे.

पुणे लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांच्यासह जगदीश मुळीक, माजी खासदार संजय काकडे, माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, शिवाजी मानकर हे इच्छुक होते. मात्र मोहोळ यांच्या पारड्यात भाजपकडून उमेदवारीचे माप टाकण्यात आल्याने मुळीक प्रचारापासून दूर असल्याचं चित्र होते. त्यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे देखील शहरात बरीच राजकीय चर्चा रंगली होती. जगदीश मुळीक हे वडगावशेरी विधानसभेचे आमदार देखील राहिलेले असून त्यांची नाराजी भाजपसाठी डोकेदुखी ठरु शकली असती.

दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर जगदीश मुळीक यांच्यासह बंधू योगेश मुळीक प्रचारात सक्रियपणे सहभागी होऊ लागले आहेत. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात घेण्यात आलेल्या महिला आघाडीच्या आढावा बैठकीला मुळीक यांनी हजेरी लावली, त्यांनी स्वतः फेसबुक पोस्टच्या माध्यमातून बैठकीला उपस्थिती लावल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे भाजपमध्ये सुरू असणाऱ्या नाराजी नाट्यावर सध्या पडदा पडल्याचं दिसत आहे.

वडगाव शेरीत मोहोळांसाठी ‘डबल इंजिन’
वडगाव शेरी विधानसभेचे आमदार सुनील टिंगरे हे मुरलीधर मोहोळ यांचे जवळचे मित्र मानले जातात. दोघांनी महापालिका सभागृहात काम देखील केलेल आहे. मोहोळ यांचे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर टिंगरे यांनी स्वतः आपली यंत्रणा कामाला लावलीय. आता भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख असणारे जगदीश मुळीक हे देखील आपली नाराजी बाजूला करत सक्रिय झाल्याने मतदारसंघात मोहोळ यांना डबल इंजिनची साथ मिळणार आहे.

Leave A Reply

Translate »