‘जुन्या वाड्यांचा प्रश्न सोडवणारच !’ रवींद्र धंगेकर यांचा निर्धार

पुणे: कसबा मतदार संघातील जुन्या वाड्यांचा प्रश्न आता खूप गंभीर बनला असून हा सोडवण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे प्रयत्न करून येथील सर्व रहिवाश्यांना चांगले घर मिळावे, यासाठी प्रयत्न करुन हा प्रश्न मी सोडवणारच. असा निर्धार महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज पदयात्रेच्या समारोप प्रसंगी व्यक्त केला. येथील वाड्यांचा प्रश्न बिकट बनत चालला आहे हे भाजपला दिसत होते. पण त्यांनी काहीही केले नाही. त्यामुळे मतदारांनी आता जुन्या वाड्यांचा प्रश्न सोडवण्याची दृष्टी आणि धमक असणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या पुणेच्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी  महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी हे पदयात्रेच्या समारोप प्रसंगी नागरिकांना आवाहन केले. तेव्हा टाळ्यांचा कडकडाट होत राहिला.

त्यांच्या पदयात्रांमध्ये महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे मोठमोठे झेंडे, तसेच धंगेकर यांचे छायाचित्र असलेले पोस्टर, हाताचा पंजा हे निवडणूक चिन्ह असलेले पोस्टर आणि धंगेकर यांच्या सार्वजनिक कार्याचा पट मांडणारे फलक याबरोबरच महाविकास आघाडीच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी ही धंगेकरांच्या पदयात्रांमध्ये दिसून आली.

रविवार दिनांक १२ रोजी सकाळी १० वाजता प्रभाग क्र.१८ येथील गौरी आळी परिसरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखाप्रमुख रुपेश पवार यांच्या कार्यालयापासून पदयात्रेस सुरुवात झाली. तेथे सर्वप्रथम शिवसेनेच्या महिला शाखेतर्फे औक्षण करण्यात आले. तसेच रवींद्र धंगेकर यांना भगवा फेटा घालून सन्मानित करण्यात आले. यावेळी शेकडो भगव्या झेंड्यांनी सारा परिसर भरुन गेला होता. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रवींद्र धंगेकर यांनी नमन केले. तेव्हा बँड पथक आणि ढोल ताशांनी सारा परिसर दुमदुमून गेला.

त्यांच्या रविवारच्या पदयात्रेत त्यांच्या समवेत दत्ता बहिरट, कमलताई व्यवहारे, बाळासाहेब आमरळे, मिलिंद काची, कान्होजी जेधे, सुभाष थोरवे, प्रशांत सुरशे, विनय ढेरे, हॅरोल्ड मॅसी, सौरभ आमरळे, गौरव बालंदे, आयुब पठाण याबरोबरच शिवसेनेचे संजय मोरे, गजानन पंडित, विशाल धनकवडे, संदीप गायकवाड, राजेंद्र शिंदे, रुपेश पवार, पंकज बगिदे, चंदन साळुंखे, संतोष भूतकर आणि राष्ट्रवादीचे गणेश नलावडे, हेमंत येवलेकर, सुनील खाटपे, निलेश वरे, अजय दराडे, सुशील हजारे, किरण पोकळे आदी प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते.

महाविकास आघाडी झिंदाबादच्या घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडणाऱ्या या पदयात्रेचे नागरिक उत्स्फूर्तपणे स्वागत करत होते. गुरुवार पेठ, रविवार पेठ, गणेश पेठ, महात्मा फुले पेठ अशा शहराच्या मध्यभागातून पदयात्रेद्वारे रवींद्र धंगेकर यांनी नागरिकांशी संपर्क साधला. त्यावेळी रस्त्यावर ट्रॅफिकजॅम होऊ नये याची विशेष काळजी घेतली जात होती. अनेक गणेश मंडळांच्या येथे आरती व सत्कार व्यापाऱ्यांकडून जंगी स्वागत होत राहिले होते. मंदिरांमध्ये दर्शन घेऊन बाहेर येताना अनेकांनी ‘सर्वसामान्यांचे प्रश्न धंगेकरच सोडवू शकतील’, असा विश्वास व्यक्त केल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. कान्होजी जेधे यांच्या कार्यालयाच्या परिसरात जंगी स्वागत करून रवींद्र धंगेकरांना ‘शिंदेशाही पगडी’ घालण्यात आली. जैन मंदिराच्या समोरील ५२ बोळ परिसरातील कोपरांकोपरा त्यांनी पिंजून काढला. ‘मी रवींद्र धंगेकर’ असे रंगवलेल्या भगव्या रंगाच्या टोप्या अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी घातल्या होत्या. अखिल वंजारी समाज संघटना आणि ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने त्यांचा सत्कार केला गेला. सुमारे ५ तास चाललेली ही प्रचंड मोठी पदयात्रा कस्तुरे चौक येथे संपली.

Leave A Reply

Translate »