दिग्दर्शक संजय जाधव घेऊन येत आहेत  ‘पुन्हा दुनियादारी’

  • मोठ्या उत्साहात चित्रपटाचे पोस्टर लॉन्च

‘दिल दोस्ती दुनियादारी’ म्हणत कॉलेजच्या विद्यार्थ्यांबरोबरच समस्त महाराष्ट्राच्या पसंतीस उतरलेला चित्रपट म्हणजे ‘दुनियादारी’. ज्येष्ठ साहित्यिक सुहास शिरवाळकर यांच्या कादंबरीवर आधारीत व दिग्दर्शक संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ या  चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक रेकॉर्ड मोडले. या चित्रपटातील श्रेयस -दिग्याची जीगरी दोस्ती, बोल्ड शिरीन आणि चॉकलेट बॉय श्रेयसची लव्ह स्टोरी, जितेंद्र जोशीने वठवलेला ‘साई’ नावाचा व्हिलन असेल किंवा श्रेयसवर प्रेम करणारी भोळी मिनू असेल आजही ही पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. या सुपरहिट चित्रपटाच्या  तब्बल 10 वर्षा नंतर दिग्दर्शक संजय जाधव ‘पुन्हा दुनियादारी’ हा नवा चित्रपट घेवून येत आहेत.       

‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने माऊली प्रोडक्शन निर्मित ‘पुन्हा दुनियादारी’ या चित्रपटाचे पोस्टर  लॉन्च करण्यात आले. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हा पोस्टर लॉन्च सोहळा युवा वर्गाच्या उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी दिग्दर्शक संजय जाधव, डी. पी. यू. बी स्कूलचे डायरेक्टर डॉ. अमोल गावंडे,निर्मात्या डॉ. मनिषा किशोर टोलमारे,निर्माता डॉ अंकुश हरीकिशन अग्रवाल, अभिनेत्री आयली घिया,माऊली प्रॉडकशन ची संपूर्ण टीम आणि आदी मान्यवर उपस्थित होते.  या चित्रपटाचे लवकरच चित्रीकरण सुरू होणार असून, पुन्हा तीच दुनियादारी दिग्दर्शक संजय जाधव यांच्या वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. 

दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, ‘दुनियादारी’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी जे प्रेम दिलं , तसंच ‘पुन्हा दुनियादारी’ ला सुद्धा प्रेक्षक देतील . हा चित्रपट आणि यातील पात्र नव्या अंदाजात प्रेक्षकांना पडद्यावर दिसणार असून , मैत्री आणि प्रेमाची नवी संकल्पना मांडणारा हा चित्रपट आहे. चित्रपटातील कलाकार जाणून घेण्यासाठी थोडे दिवस प्रेक्षकांना वाट बघावी लागणार आहे. 

चित्रपट निर्माते डॉ. मनिषा किशोर टोलमारे म्हणाले, माऊली प्रोडक्शन हे देशाला एक ‘रिवोल्युशनरी स्क्रीन’ची ओळख करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच पुन्हा दुनियादारी हा सुद्धा त्यापैकीच एक प्रयत्न असून मराठी चित्रपटांकडे प्रेक्षक पुन्हा वळतील आणि प्रेक्षकांना मनोरंजन तसेच सिनेमा क्षेत्राला नवी उर्जा देणारा हा दर्जेदार चित्रपट असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Translate »