एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि
श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती, आळंदी देवाची, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने २ री भारतीय संतसाहित्य उच्चशिक्षण परिषद

(मंगळवार, दि. १९ जुलै २०२२ ते गुरुवार, २१ जुलै २०२२)

पुणे: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती, आळंदी (देवाची), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २री भारतीय संतसाहित्य उच्चशिक्षण परिषद, मंगळवार दि. १९ जुलै २०२२ ते गुरूवार, दि.२१ जुलै २०२२ या कालावधीत कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संत श्री ज्ञानेश्वर सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे.
भारतीय संत साहित्यामध्ये अनेक वैज्ञानिक व तात्त्विक तथ्यांचा उल्लेख आढळतो. अर्थात भारतीय संतांना भारतीय ज्ञानपरंपरेतून उपजलेल्या अनेक शोधांबद्दल माहिती होती, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. अनेक पाश्चात्त्य वैज्ञानिकांच्या नावे असलेले शोध हे पूर्वी भारतामध्ये लागले असल्याचे आता जगासमोर आले आहे. म्हणजेच, ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान, भक्ती, श्रद्धा या सर्वांचा ऊहापोह करणारे संत साहित्य ह्याचा उच्चशिक्षणात समावेश होणे ही काळाची गरज आहे. त्याच बरोबर, सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये संत साहित्याचा अंर्तभाव नाही. तसेच हे संत साहित्य काळाच्या कसोटीवर उतरलेले असून, ते धार्मिक नाही, तर पूर्णपणे वैज्ञानिक आहे, या वर या परिषदेत विचारमंथन होईल.
केंद्र सरकारने देखील नुकतेच नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर केले आहे. ज्यानुसार प्राचीन भारतीय ज्ञान प्रणालीवर भर दिला जाणार आहे. तद्वतच संतसाहित्यातून प्रतीत होणार्‍या ज्ञानाचा शिक्षणपद्धतीत समावेश केला जावा, अशी ही संकल्पना हया परिषदेमागे आहे.
या परिषदेची संकल्पना एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड यांची आहे. तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद संपन्न होत आहे.
या परिषदेचा उद्घाटन समारंभ १९ जुलै रोजी दुपारी २.०० वा. होणार आहे. यासाठी केरळच्या रामकृष्ण मठ, रामकृष्ण मिशन सेवाश्रमचे सचिव स्वामी नरसिंहनानंद प्रमुख पाहुणे व उद्घाटक असतील. संत, विद्वान आणि श्रीपीठमचे संस्थापक ह.भ.प.स्वामी परिपूर्णानंद सरस्वती हे अध्यक्ष असतील. तसेच मोक्षयतं आंतरराष्ट्रीय योगाश्रमचे संस्थापक पद्मश्री स्वामी भारत भूषण हे सन्माननीय अतिथी असतील.
समारोप सत्र २१ जुलै २०२२ रोजी दुपारी ४.३० वा. होईल. या समारंभासाठी अध्यक्ष म्हणून जेष्ठ साहित्यिक, समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस असतील. मुंबई येथील भक्तिवेदांत विद्यापीठाचे तत्वज्ञानाचे प्राध्यापक व इस्कॉन मुंबईचे उपाध्यक्ष डॉ. मुकुंद माधव दास हे प्रमुख पाहुणे असतील.
नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर हे बीजभाषण करतील. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे सन्माननीय अध्यक्ष म्हणून उपस्थित असतील.
तीन दिवसीय परिषदेत उद्घाटन आणि समारोपाचे सत्र वगळता चार सत्रे आहेत. या सत्रांचे विषय खालील प्रमाणे
पहिले सत्रः संत साहित्याचा उच्च शिक्षणात समावेश- आवश्यकता व उपयुक्तता
(राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या मार्गदर्शक तत्वानुसार)
वक्तेः डॉ. दत्तात्रय तापकीर, प्रा.डॉ. मीना आहेर, प्रा.डॉ. संजयकुमार कोळी
दुसरे सत्र ः भगवद्गीता व मानवी जीवन
वक्तेः डॉ.सदानंद मोरे, कवयित्री सौ.उर्मिला विश्वनाथ कराड, श्री. रमणलाल शाह व श्री.चारूदत्त आफळे
३: धर्मग्रंथ व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास
वक्तेः डॉ. क्षितिज पाटुकले, डॉ. एस.एन.पठाण, डॉ. प्रमोद शिंदे, डॉ. पल्लवी वर्तक
४: संत साहित्यातून शाश्वत विकास – काल, आज आणि उदया
वक्तेः डॉ. रामचंद्र देखणे, श्री. सचिन परब, श्री. संजय भोसले.
तसेच, अनेक नामवंत शिक्षण तज्ञ, वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार, तत्वज्ञ, संत साहित्याचे अभ्यासक परिषदेत आपले विचार मांडतील.
परिषदेचा मुख्य उद्देश म्हणजे, सध्याच्या शालेय, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणात संत साहित्याचा समावेश कमी प्रमाणात आहे. या परिषदेच्या माध्यमातून काही ठराव संमत करून सरकारला पाठविले जातील, ज्यायोगे शैक्षणिक धोरण ठरवितांना शासनाला याचा विचार करता येईल.
या परिषदेमध्ये ज्या कीर्तनकार / प्रवचनकार / विणेकरी यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी आपले नाव श्री.शालीकराम महाराज खंदारे मो.९८५००७४२०३, श्री. महेश महाराज नलावडे मो. ९८२२५४७७२७, श्री. रामचंद्र महाराज इंगोले मो.९०२८२७८४३०, ह.भ.प. श्री. सुदाम महाराज पानेगांवकर मो.९९२२२९९२५० आणि श्री. विक्रम शिंदे मो. ९३७३६९६८५२ या नंबरवर संपर्क साधावा.
अशी माहिती भारतीय संत साहित्य उच्चशिक्षण परिषदेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष ह.भ.प. श्री. बापुसाहेब मोरे, संयोजन समितीचे कार्यकारी अध्यक्ष ह.भ.प.रविदास महाराज शिरसाठ, समन्वयक डॉ. संजय उपाध्ये, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, डॉ. महेश थोरवे आणि डॉ. अर्चना चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Leave A Reply

Translate »