वंचितांच्या कला-कौशल्याचे मोहक सादरीकरण

‘आश्रय इनिशिएटिव्ह फॉर चिल्ड्रन’ संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन, प्रदर्शन उत्साहात

पुणे : रंगतदार, चैतन्यमय आणि वैविध्यपूर्ण कला-कौशल्यांचे मोहक सादरीकरण करत वंचित घटकातील मुलामुलींनी उपस्थितांची मने जिंकली. निमित्त होते, कोरेगाव पार्क येथील डॉन बॉस्को युवा केंद्रात आयोजित ‘आश्रय इनिशिएटिव्ह फॉर चिल्ड्रन’ संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन व प्रदर्शनाचे! वाघरी, महार, मातंग, पारधी, सिकलगार आदी भटक्या, विमुक्त जमाती व दुर्लक्षित समाजाच्या उत्थानासाठी कार्यरत असलेल्या ‘आश्रय’ संस्थेचे संमेलन उत्साहात झाले.

पुण्याचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक मंगेश गोळे, विनोद पवार, ‘आश्रय’चे संचालक व टाटा कम्युनिकेशनच्या सीएसआर विभागाचे माजी प्रमुख संजीव तारे यांच्यासह बजाज फिनसर्व, झेडएस असोसिएट्स, टॉमटॉम, रोटरी क्लबच्या सीएसआर विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या केलेचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहित केले. विद्यार्थी व समाजातील सदस्यांनी बनवलेल्या चविष्ट खाद्यपदार्थांचा आनंद उपस्थितांनी घेतला.

एक आदर्श शाळा, व्यावसायिक संस्था व समुदायातील सदस्यांची एकी यातून आशादायी व सर्वसमावेशक भावभावनांचे दर्शन या कार्यक्रमात घडले.  सर्व मुले व समुदायातील सदस्यांच्या सहभागातून कार्यक्रमाची आखणी, नियोजन, सादरीकरण झाले. ५५० मुलेमुली व समुदायातील ६०० पेक्षा अधिक लोक यामध्ये सहभागी झाले. सुरुवातीला, व्यावसायिक शिक्षण उपक्रमांतील विद्यार्थ्यांचे स्टॉल, सादरीकरण झाले. त्यामध्ये विद्यार्थी आणि समाजातील सदस्यांनी तयार केलेले कपडे, पिशव्या, दागिने, पेंटिंग्ज, साबण, बुक-मार्क्स, कानातले दागिने, मेणबत्त्या आणि इतर कला प्रकारांचा समावेश होता. ब्युटीशियन-कार्यक्रमातील विद्यार्थ्यांनी टॅटू मेकिंग, मेहंदी, नेल आर्ट केले.

डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, “शिक्षण, आरोग्य, कौशल्य व सामाजिक विकास यातून या दुर्लक्षित घटकांचे सक्षमीकरण करण्याचे ध्येय ‘आश्रय’ संस्थेचे आहे. वर्षभर विविध उपक्रमांतून चालणाऱ्या कार्याचे दर्शन घडविण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे होता. शैक्षणिक, आरोग्य, मानसिक आरोग्य आधार व शाश्वत समाज विकास टीमने अतिशय रंजकपणे आपल्या कार्याचे सादरीकरण केले. ‘आश्रय’च्या प्रत्येक लाभार्थ्यांचा सहभाग असलेला हा रंगतदार, चैतन्यमय आणि वैविध्यपूर्ण असा कार्यक्रम होता.”

‘हमारी शाला’ हा वंचित घटकांतील मुलांसाठी सर्वात वेगळा असा शालेय कार्यक्रम आहे. यामध्ये प्रकल्पाधारित व प्रात्यक्षिक शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कथा व कवितांच्या पुस्तकाचे सादरीकरण झाले. सामुदायिक प्रकल्प प्रदर्शित करत त्यातून समुदायाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिक्षणाचा कसा उपयोग होईल, हे दाखवून दिले. स्वसंरक्षण वर्ग, संगीत वर्ग, नृत्य वर्ग आणि मूल्य शिक्षण वर्गातील मुलांनी प्रात्यक्षिके सादर केली. शारीरिक व मानसिक आरोग्याचे महत्व सांगणारे सादरीकरण झाले.

Leave A Reply

Translate »