शिवराज राक्षे नवा ‘महाराष्ट्र केसरी’

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : महेंद्र गायकवाड उपमहाराष्ट्र केसरी

पुणे : नांदेडच्या शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला अवघ्या दीड मिनिटात चीतपट करताना ६५ व्या राज्य अजिंक्यपद कुस्ती व प्रतिष्ठेच्या ‘महराष्ट्र केसरीची गदा’ पटकावली. शिवराज राक्षेच्या रूपाने महाराष्ट्राला नवा ‘महाराष्ट्र केसरी’ मिळाला. स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या महेंद्र गायकवाड याला उपमहाराष्ट्र केसरीवर समाधान मानावे लागले.

महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याला मानाची गदा, महिद्रा थार ही गाडी व रोख पाच लाख रुपयांचे बक्षीस तर उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड याला मानाची गदा, ट्रक्टर व रोख अडीच लाख रुपये देवून सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतीत शिवराज व महेंद्र हे दोघेही तुल्ल्यबळ मल्ल यांनी एकमेकाना आजमावायला सुरुवात केली. मात्र यावेळी शिवराज राक्षेला पंचाकडून कुस्ती करण्याची ताकीद मिळाली. त्यानंतर ४० व्या सेकंदाला महेंद्रला देखील कुस्तीची ताकीद मिळाली. त्यावेळी बलदंड ताकदीच्या शिवराज  राक्षेने दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न महेंद्रने हाणून पाडण्याच्या प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी शिवराजने महेंद्रवर ताबा घेण्याचा प्रयत्न करताना महेंद्रला दाबून टाकत चीतपट करताना महाराष्ट्र केसरीवर आपले नाव कोरले. शिवराजच्या विजयानंतर प्रेक्षकांनी एकाच जल्लोष केला.

तत्पूर्वी, माती विभागातून अंतिम लढतीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने वाशीमच्या सिकंदर शेखला ६-४ असे पराभूत करताना महाराष्ट्र केसरी किताबी लढतीत प्रवेश केला. लढतीच्या पहिल्या फेरीत दोन्ही मल्लांनी एकमेकाना आजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी सिकंदरला निष्क्रिय कुस्तीची ताकीद देण्यात आली. मात्र सिकंदर यावेळी गुण मिळवू शकला नाही. त्यामुळे एक गुण महेंद्रला मिळाला. त्यानंतर १० सेकंदातच सिकंदरने ताबा घेताना २  गुणांची कमाई केली. पहिल्या फेरीत सिकंदरने २-१ अशी आघाडी मिळविली.
दुसऱ्या फेरीत सिकंदरने आक्रमक चाल रचताना महेंद्रला बाहेर ढकलताना एक गुण वसूल केला. यावेळी ३-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर महेंद्रला निष्क्रिय कुस्तीचा फटका बसला. यामुळे सिकंदराला एक गुण मिळाला. यावेळी सिकंदर ४-१ अशा आघाडीवर होता. आक्रमक कुस्ती होण्याच्या नादात महेंद्रने आपल्या ताकदीचा उपयोग बाहेरची टांग लावून सिकंदरला उचलून खाली फेकताना चार गुण कमावले. हाच या कुस्तीचा निर्णायक क्षण ठरला. शेवटी महेंद्रने सिकंदराला बाहेर ढकलताना अजून एका गुणाची कमाई करताना ही लढत ६-४  अशी जिंकताना महाराष्ट्र केसरीच्या किताबी लढतीसाठी पात्र ठरला.

गादी विभागाच्या लढतीत नांदेडच्या शिवराज राक्षेने नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरला ८-१ असे पराभूत करताना महाराष्ट्र केसरी या किताबी लढाईसाठी पात्र ठरला. आजच्या लढतीत शिवराजने चपळता व बलदंड शरीराचा वापर करताना  चार वेळा हर्षवर्धनला बाहेर ढकलताना ४ गुणांची कमाई केली. दोनवेळा दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न करताना प्रत्येकी एकेक  असे दोन गुण वसूल केले.

दुसऱ्या फेरीत पिछाडीवर असलेल्या हर्षवर्धनने आक्रमक खेळाला सुरुवात करताना शिवराजचा दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बलदंड शरीर व ताकदीच्या जोरावर शिवराजने हर्षवर्धनचा प्रयत्न उधळून लावत ताबा घेत २ गुणाची कमाई करताना गुणांची भक्कम आघाडी निर्माण केली. शेवटचे काही क्षण बाकी असताना आक्रमक झालेल्या हर्षवर्धनने आव्हान टिकविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. मात्र यात हर्षवार्धानला केवळ एक गुण यश मिळाले.  अशा प्रकारे ही लढत शिवराजने ८-१ अशा गुनाधीक्याने जिंकताना प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी मुख्य लढतीसाठी पात्र ठरला.

किताबी लढत खेळणाऱ्या मल्लाचा स्पर्धेतील प्रवास
माती विभाग : महेंद्र गायकवाड :  सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाडने पहिल्या फेरीत नांदेडच्या अनिल जाधवला ९-० असे पराभूत करताना आगेकूच केली. त्यानंतरच्या फेरीत हिंगोलीच्या दिगंबर भूतनरला चीतपट केले. तिसऱ्या फेरीत लातूरच्या शैलेश शेळकेला ५-२ असे पराभूत करताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर उपांत्य फेरीत कोल्हापूरच्या शुभम शिदनाळेला चीतपट करताना महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत दावेदारी दाखल केली आहे.

गादी विभाग : शिवराज राक्षे : नांदेडच्या शिवराज राक्षेने गादी विभागात दमदार महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याने पहिल्या फेरीत उस्मानाबादच्या धीरज बारस्करला १०-० असे एकतर्फी, दुसऱ्या फेरीत साताऱ्याच्या तुषार ठोंबरेला १०-० असे एकतर्फी तर तिसऱ्या फेरीत संभाजीनगरच्या (औरंगाबाद) पांडुरंग मोहारेला पराभूत करताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या फेरीत शिवराजने पुण्याच्या हर्षद कोकाटेला पराभूत करताना गादी विभागातून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत हिंगोलीच्या  गणेश जगतापवर १०-० अशी मात करताना अंतिम फेरीत प्रवेश केला.    
——————————-

कुस्तीगीरांच्या मानधनात तीनपटीने वाढ

देवेंद्र फडणवीस यांची घोषणा : राज्य सरकार ‘मिशन ऑलिम्पिक’ राबवणार  

स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी :

कुस्तीगीरांच्या मानधनात तीनपटीने वाढ करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. यामध्ये राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजयी होणाऱ्या कुस्तीगिरांचे मानधन ६ हजार वरून २० हजार, अर्जुन पुरस्कार विजेत्यांचे मानधन ६ हजार वरून २० हजार तर हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी व रुस्तुम ए हिंद या कुस्तीगिरांचे मानधन ४ हजार वरून १५ हजार इतके करण्यात येईल. तसेच कुस्तीगिरांचे निवृत्ती वेतन अडीच हजारांवरून साडे सात हजार करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी आश्वासित केले. कुस्ती स्पर्धांमध्ये यशस्वी कुस्तीगीरांना शासकीय नोकरीमध्ये सामावून घेण्यात येईल.

स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या ६५ व्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन संकृस्ती प्रतिष्ठानच्या वतीने मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले होते.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे बक्षीस वितरण  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, माजी खासदार अशोक मोहोळ, अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या सह राजकीय व कुस्ती क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.  

महाराष्ट्र केसरी विजेत्याला चांदीची गदा, महिंद्रा थार गाडी व रोख पाच लाख तर, उपविजेत्याला चांदीची गदा, ट्रक्टर व रोख अडीच लाख रूपायांचे बक्षीस देण्यात आले. राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील प्रत्येक वजनी गटातील विजेत्याला सुवर्णपदक व एसडी जावा गाडी बक्षीस म्हणून देण्यात आली.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, खाशाबा जाधव यांनी ६१ वर्षांपूर्वी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविले. मात्र, त्यानंतर महाराष्ट्रातील कुस्तीगीरांना पदकांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यांच्या कामगिरीत सुधारणा व्हावी व त्यानी ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये पदकांची कमाई करावी, यासाठी राज्य सरकार मिशन ऑलिम्पिक हे अभियान सुरु करणार आहेत. भविष्यात महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरविण्याचा प्रस्ताव आल्यास त्याला राज्य सरकार प्रोत्साहन देणार असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.

राजकीय आखाड्यात महाराष्ट्र केसरीचा किताब पटकाविलेल्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचा मान मिळाला, अशी टिपणी फडणवीस यांनी केली. स्पर्धेच्या भव्य दिव्य व यशस्वी आयोजनाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी संयोजक मुरलीधर मोहोळ यांचे तोंडभरून कौतुक केले.

ब्रिजभूषण शरण सिंग म्हणाले, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यातील संबंध हे पहिल्यापासूनच खूप चांगले आहेत. महाराष्ट्राचे सुपुत्र खाशाबा जाधव यांनी ६१ वर्षांपूर्वी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविले, त्यानंतर मात्र दुर्दैवाने महाराष्ट्रातील पैलवान मागे पडले. कुस्तीला पुन्हा एकदा वैभावाचे दिवस आणण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, मुलीना सर्वच क्षेत्रात पुढे नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोडी प्रोत्साहन देत आहेत. दिपाली सय्यद यांनी महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरु करावी, अशी मागणी केली आहे, त्याचा सकारात्मक विचार करावा.

गिरीश महाजन म्हणाले, कुस्तीगीर प्रचंड मेहनत करून आपली ताकद पणाला लावत असतो. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव उंचावत असतो. त्यामुळे कुस्तीगीरांच्या मानधनात वाढ करण्यात येईल. त्यांच्या खुराकाची जबाबदारी सरकार घेईल. कुस्ती हा गरीबाच्या घरातला, ग्रामीण भागातील रांगडा खेळ आहे. त्याला राजाश्रय देण्याची गरज ओळखून आम्ही संरकारच्या पातलीवर लवकरच निर्णय घेऊ.”

खासदार रामदास तडस म्हणाले, कुस्तीगीरांच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी नोकरी, वैद्यकीय मदत, तालुका व जिल्हा स्तरावर क्रीडा संकुलात mat देण्यात यावी. तसेच कुस्तीचे प्रेरणास्थान खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मश्री देण्याचा प्रस्ताव राज्याने केंद्राकडे पाठवावा.

स्पर्धेचे संयोजक मुरलीधर मोहोळ यांनी प्रास्ताविकात सांगितले की, ज्या मामासाहेब मोहोळ यांनी ६५ वर्षापूर्वी महाराष्ट्र केसरीची सुरुवात केली. त्या मोहोळ कुटुंबीयांकडे या प्रतिष्ठीत स्पर्धेचे आयोजन आले. ही स्पर्धा अत्यंत भव्यदिव्य, सर्वांच्या स्मरणात राहील अशा पद्धतीने आयोजित करून मामासाहेब यांना आदरांजली वहाण्याची संधी आम्हाला मिळाली, याचे समाधान आहे.

Leave A Reply

Translate »