मुलींची पहिली शाळा सुरू करण्याच्या ऐतिहासिक घटनेचा शतकोत्तर अमृत महोत्सव माळी महासंघातर्फे रविवारी फुले दांपत्य सन्मान महारॅलीचे आयोजन

0

पुणेः- क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानजोती सावित्रीआई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. स्त्रियांसाठी शिक्षणाची द्वारे खुली करून देण्याच्या या ऐतिहासिक घटनेला १७५ वर्षे ( शतकोत्तर अमृत महोत्सव) पूर्ण होत आहेत. या निमित्तान फुले दांपत्याच्या या महान कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि भिडे वाडा येथे राष्ट्रीय स्मारकाचे निर्माण तसेच विकास करण्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी माळी महासंघातर्फे रविवार दिनांक १ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता दगडुशेठ गणपती मंदिरासमोरील भिडेवाडा ते गंज पेठेतील महात्मा फुलेवाडा (समता भूमी) अशी भव्य फुले दांपत्य सन्मान महारॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे,  दीपक जगताप, माजी आमदार कमलताई ढोले पाटील, काळुराम  गायकवाड, सचिन शिवरकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष शुभांगी लोंढे, पुणे शहर महिला अध्यक्ष स्मिता लडकत, पुणे शहरचे युवा कार्याध्यक्ष योगेंद्र लडकत आदी उपस्थित होते. दगडूशेठ गणपती मंदिरासमोरील भिडेवाडा येथून या रॅलीला प्रारंभ होणार असून पुढे शिवाजी रोड मार्गे फडगेट पोलीस चौकी येथून डाव्या बाजूने गंजपेठ पोलीस चौकी आणि महाराणा प्रताप रोडने गंज पेठेतील महात्मा फुलेवाडा अर्थात समता भूमी येथे येऊन सर्व फुले प्रेमी फुले दांपत्याला अभिवादन करणार आहेत. या महारॅलीचा समारोप सावित्रीबाई फुले स्मारक येथे होईल.  या महारॅलीला महाराष्ट्रातून सुमारे दहा हजारापेक्षा अधिक फुलेप्रेमी समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. या रॅलीव्दारे फुले दांपत्याचा जीवन प्रवास उलगडण्यात येणार आहे. महात्मा फुले यांच्या जीवनपटावर आधारित भव्य दिव्य अशा स्वरूपात चित्ररथाची मांडणी करण्यात येणार आहे. ढोल-ताशा आणि लेझीम पथके, शंखनाद, आकर्षक फुलांची सजावट करून रॅली मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या अंथरण्यात येणार आहेत. या रॅलीमध्ये झेंडे आणि फलक घेऊन फुले प्रेमी सहभागी होणार आहेत. या रॅलीमध्ये महाराष्ट्रातील माळी समाजात कार्यरत असलेल्या सर्व संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माळी महासंघातर्फे यावेळी करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Translate »