पारंपारिक खेळांतून जपला जातोय स्त्रियांचा फिटनेस

पारंपारिक खेळाद्वारे गरजू मुली बनल्या आर्थिकदृष्ट्या सक्षम

पुणे: नियमित व्यायाम न करण्यासाठी स्त्रियांकडे अनेक कारणं असतात. मात्र सणासुदिंच्या दिवसांमध्ये स्त्रिया पारंपरिक खेळ आवडीने खेळत असतात. मंगळागौरीत खेळले जाणारे खास स्त्रियांचे खेळ हे महाराष्ट्राचे मोठे सांस्कृतिक संचित आहे. लहान मुलींपासून ते साठी ओलांडलेल्या आजींपर्यंत सर्वच वयोगटांतील स्त्रिया यात उत्साहाने सहभागी होत असतात. या खेळाचा सराव करत पुण्यातील महिलांनी त्यांचे आरोग्यतर जपलेच आहे त्याचबरोबर गरजू आणि आर्थिक दृष्ट्या मागास मुलींना मदत करण्याच्या दृष्टीने विविध ठिकाणी मंगळागौरीच्या कार्यक्रमांचे आयोजनदेखील करत आहेत. निरामय संस्थेच्या किशोरी शक्ती प्रकल्प अंतर्गत संस्थेच्या मुलींना शारिरिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी क्षितिजा आगाशे आणि राणी थोपटे यांनी १५ वर्षांपूर्वी हा उपक्रम सुरू केला.

मंगळागौरी, नागपंचमी, हरितालिका, गणेशोत्सव, नवरात्रकाळात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन नेहमीच केले जात असते. सणांमध्ये पारंपरिक तसेच आधुनिक खेळांचे दिमाखदार सादरीकरण करण्यासाठी निरामय किशोरी शक्ती प्रकल्प मधील मुली आता सज्ज झाल्या आहेत. निरामय संस्थेचा किशोरी शक्ती प्रकल्पाचा हा उपक्रम असून दीपा कुलकर्णी त्याच्या प्रमुख समन्वयक आहेत. स्नेहमेळावे, विविध सांस्कृतिक मंडळ, जेष्ठ नागरिक संघ, मंदिरे अशा विविध ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.

क्षितिजा आगाशे म्हणाल्या की, गरजू मुलींना मंगळागौरी च्या खेळांचे प्रशिक्षण देऊन आणि कार्यक्रम स्वीकारून त्यातून होणारी आर्थिक मदत ही त्यांच्या शिक्षणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी वापरायची असा सामाजिक हेतू त्यामागे आहे. त्यातच आजकाल स्त्रियांना स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. घरात कामाचा खूप ताण असतो, घरातली कामं करुन थकायला होतं. व्यायामात वेळ घालवून कसं चालेल ते व्यायामाचा कंटाळा येतो इथपर्यंतची अनेक  कारणं असतात. त्यावर मात करत पारंपारिक खेळाद्वारे त्या आपले आरोग्य उत्तमरित्या जपत असल्याचे चित्र आज  पहायला मिळत आहे.

Leave A Reply

Translate »