सृजन फाउंडेशन, नांदेड सिटी आयोजित स्व. ज्योत्स्ना भोळे स्मृती स्वरोत्सव 4 व 5 जून रोजी

नाट्यसंगीत, शास्त्रीय गायनाची पर्वणी : युवा कलाकारांसह प्रतिथयश कलाकारही लावणार हजेरी

पुणे – शास्त्रीय, सुगम तसेच नाट्यसंगीतातील प्रतिथयश गायक आणि प्रतिभावान युवा कलाकारांना ऐकण्याची संधी यंदाच्या ‘सरोत्सव’ या मैफलीत मिळणार आहे. सृजन फाउंडेशन आणि नांदेड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने विख्यात गायिका स्व. ज्योत्स्ना भोळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित ही गायन-वादनाची मैफल शनिवार, दि. 4 आणि रविवार, दि. 5 जून 2022 रोजी पुण्यात होणार आहे, अशी माहिती सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश पायगुडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. महोत्सवाचे यंदाचे 12वे वर्ष आहे.


सृजन फाउंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी गायिका रागिणी देवळे आणि तबलावादक गीत इनामदार यांची निवड करण्यात आली आहे. दोन्ही कलावंतांना एका वर्षासाठी प्रत्येकी 11 हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. यासाठी उद्योजक प्रकाश धोका यांचे सहकार्य लाभले आहे.


पत्रकार परिषदेस तरंगिणी प्रतिष्ठानचे पं. शौनक अभिषेकी, अभिनेते अधिश पायगुडे उपस्थित होते. स्व. ज्योत्स्ना भोळे यांच्या 108व्या जयंतीचे औचित्य साधून हा स्वरोत्सव टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी पाच ते आठ या वेळात आयोजित करण्यात आला आहे. स्वरोत्सवाच्या पहिल्या दिवशी (दि. 4) नाट्यसंगीताची पर्वणी रसिकांना मिळणार आहे. स्वरोत्सवाची सुरुवात प्रतिभावान गायक श्रीरंग भावे आणि विश्वजित मेस्त्री यांच्या गायनाने होणार असून मैफलीचा समारोप प्रसिद्ध गायिका सावनी दातार-कुलकर्णी यांच्या गायनाने होणार आहे. उदय कुलकर्णी (ऑर्गन) आणि प्रशांत पांडव (तबला) साथसंगत करणार आहेत.


स्वरोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाची (दि. 5) सुरुवात युवा शास्त्रीय गायिका डॉ. कस्तुरी पायगुडे-राणे यांच्या मैफलीने होणार असून त्यानंतर तेजस उपाध्ये (व्हायोलिन) आणि सौरभ वर्तक (बासरी) यांच्या वादनाची जुगलबंदी रसिकांना ऐकायला मिळणार आहे. त्यांना उमेश बॅनर्जी तबला साथ करणार आहेत. मैफलीचा समारोप आग्रा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या गायनाने होणार आहे. त्यांना चैतन्य कुंटे (हार्मोनियम) आणि प्रशांत पांडव (तबला) साथसंगत करणार आहेत. ज्येष्ठ टाळवादक माउली टाकळकर हे सुद्धा महोत्सवात सेवा देणार आहेत.


तरंगिणी प्रतिष्ठानचे पं. शौनक अभिषेकी, ज्योत्स्ना भोळे यांच्या कन्या वंदना खांडेकर, सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश पायगुडे, विश्वस्त अधीश पायगुडे, कार्याध्यक्ष पोपटलाल शिंगवी, कोषाध्यक्ष रामचंद्र शेटे यांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे.
युवा तसेच ज्येष्ठ कलाकारांची हजेरी
स्वरोत्सवाच्या आयोजनात वेगळेपण जपण्यात आले असून यात युवा कलाकारांपासून ज्येष्ठ कलाकारांनी हजेरी लावली आहे. यात शुभा मुद्गल, विश्व मोहन भट्ट, देवकी पंडित, आशा खाडिलकर, वीणा सहस्त्रबुद्धे, अश्विनी भिडे-देशपांडे, राहुल देशपांडे, पं. उल्हास कशाळकर, राकेश चौरसिया, रुपक कुलकर्णी, अभिजित पोहनकर, अजय पोहनकर, देबज्योती बासू, सावनी शेंडे, पं. रोणू मुजुमदार, शर्वरी जमेनिस, प्रथमेश लघाटे, भारत बालवल्ली, पंडित सुरेश
तळवलकर, पं. उपेंद्र भट, मंजुषा पाटील, पं. शौनक अभिषेकी, मुग्धा वैशंपायन, वेदश्री ओक, अनुजा झोकरकर, पं. मधुप मुद्गल, सावनी शेंडे-साठ्ये यांचे सादरीकरण झाले आहे.
स्वरोत्सव कशासाठी?
बालगंधर्व यांच्या नंतर मराठी संगीत लोप पावते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असताना ज्योत्स्नाबाई भोळे यांनी मराठी संगीत रंगभूमीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि यशस्वीपणे पेलली. 64व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले. अभिनय क्षेत्रातील योगदानाबरोबच ज्योत्स्नाबाई भोळे यांनी संगीत क्षेत्रातही मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांनी देशातील नामवंत संगीत सभांमध्ये हजेरी लावली आहे. असरदार गायन, आवजावरील हुकुमत, उत्तम दमसास, सूक्ष्म सांगितिक जाण, प्रभावी तानक्रिया तसेच शास्त्र आणि भाव यांचा सुंदर मेळ म्हणजे ज्योत्स्नाबाई. त्यांच्या स्मृती कायम राहाव्यात या हेतूने स्वरोत्सवाचे आयोजन केले जात असल्याचे प्रकाश पायगुडे यांनी सांगितले.

Leave A Reply

Translate »