कविता मनस्पंदनाचा शाब्दिक आरसा – श्रीपाल सबनीस

सुधाकर कदम लिखीत “काळोखाच्या तपोवनातून” कविता संग्रहाचे प्रकाशन

पुणे, जीवनात काळोख हा अटळ आहे. ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंत सर्वांनीच तो मान्य केला आहे. पण याच काळोखातून आनंदाचा मार्ग निर्माण करावा लागतो. कवि आपल्या शब्द प्रतिभेतून या काळोखावर प्रकाश टाकण्याचे काम करतो. कवि हा काळजाचा हुंकार, वेदना शब्दात मांडतो. त्यातून जन्मलेली कविता मनस्पंदनाचा शाब्दिक आरसा असतो असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले.

कवी-गझलगंधर्व सुधाकर कदम लिखीत “काळोखाच्या तपोवनातून” कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते नुकताच झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ट नेते उल्हासदादा पवार होते. यावेळी पद्मश्री पंडित सुरेश तळवकर, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष पंडित विकास कशाळकर, शाहीर सुरेशकुमार वैराळकर उपस्थित होते.

‘काळोखाच्या तपोवनातून’ हा सुधाकर कदमांचा दुसरा कविता संग्रह आहे. हा संग्रह गझल,कविता, गीत, अभंग अश्या पद्य विधांच्या विविध रंगात साकारला आहे. गझलगंधर्व सुधाकर कदम यांनी स्वरबद्ध केलेल्या मयुर महाजन, गायत्री गायकवाड-गुल्हाने, प्राजक्ता सावकर-शिंदे यांनी गायलेल्या गीतगझलांची मैफल यावेळी आयोजित करण्यात आली होती.

श्रीपाल सबनीस म्हणाले की, मराठीचे आद्य गझल गायक,गझल गंधर्व सुधाकर कदम हे केवळ भटांच्या किंवा इलाहीच्या दादलेवा गझला संगीतबध्द करून गाईल्यामुळे प्रसिध्द झालेले व्यक्तिमत्व नाही. त्यांच्यात तेवढ्याच ताकदीचा एक कवी,गझलकार,गीतकार व विडंबनकार विद्यमान आहे. या समग्र विधातील त्यांच्या रचना, खरोखर लक्षणीय असूनही त्यांच्या प्राधान्यक्रमाने ‘संगीतकार-गायक’ या ओळखीमुळे उशीराने रसिकांच्या मनात शिरल्या. सुधीर भटांच्या सहवासात राहिल्याने, मूलतः कवीही असलेल्या कदमांच्या लेखणीला गझल आणि तरल गीतांचा संसर्ग होणे स्वाभाविकच होते. सुधाकर कदमांच्या सामाजिक, राजकीय जाणिवा प्रगल्भ आहेत.

चांगला कवी तत्त्वचिंतक असतोच. मात्र इकबाल या शायराप्रमाणे त्याच्या रचनात काव्य लालित्यावर दार्शनिकता मात करत असेल तर तो रसोत्पत्ती पासून दूर जातो. सुदैवाने अनेक ठिकाणी कदमांची कविता तत्वस्पर्शी होऊ लागतेही पण काव्यगुण सोडत नाही.किंबहुना बरीचशी तरल व रोमँटीकच होतांना दिसते. सुधाकर कदमांच्या कविता,गझला व गझलांचा बाज कधी चिंतकाचा,कधी कलंदराचा तर कधी खट्याळ.. मिश्किल विडंबनकाराचा आहे असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेशकुमार वैराळकर यांनी केले. स्वागत प्रास्ताविक सुधाकर कदम यांनी केले.

Leave A Reply

Translate »