पुण्यात १ ते ३ सप्टेंबरदरम्यान ‘उर्गेंन आर्ट फेस्टिव्हल’; कला, साहित्य आणि कलेच्या प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाचा बहारदार मेळावा
पुणे : करुणादिप फाउंडेशन आणि त्रिरत्न वैरोचना सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १ ते ३ सप्टेंबरदरम्यान पुण्यात ‘ उर्गेंन आर्ट फेस्टिव्हल २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. या तीन दिवसीय महोत्सवात चित्रप्रदर्शने, ध्यान कार्यशाळा, कलाकार व साहित्यिक परिसंवाद, चित्रपट प्रदर्शन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती माजी चीफ मेडिकल ऑफिसर , डिफेन्स इस्टेट , इंडिया , संस्थापक करुणादीप फाऊंडेशन आणि उर्गेन आर्ट ग्लोबल डॉ. जीवक ( व्ही. डी. गायकवाड )यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी राज्याचे माजी पोलिस महासंचालक, करुणादीप फाऊंडेशनचे अध्यक्ष चंद्रशेखर दैठणकर , डॉ अस्मिता गायकवाड,डायरेक्टर फोर्टरिया आणि उपाध्यक्षा करुणादीप फाऊंडेशन, जागतिक कीर्तीचे चित्रकार सविंद्र सावरकर आणि कलादिग्दर्शक संतोष संखद आदि मान्यवर उपस्थित होते.
‘ उर्गेंन आर्ट फेस्टिव्हल २०२६’ बद्दल अधिक माहिती देताना आयोजकांनी सांगितले की, महोत्सवाचे उद्घाटन १ सप्टेंबर रोजी बालगंधर्व कलादालन येथे सकाळी १० वाजता होणार असून, ज्येष्ठ चित्रकार सवी सावरकर यांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या प्रसंगी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. सुखादेव थोरात, अभिनेते किरण माने आणि ज्येष्ठ पत्रकार राजू परूळेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दुपारी ३:०० वाजता चित्रकलेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक होईल तर सायंकाळी 5 वाजता ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ल’ या नाटकाचं प्रयोग होणार आहे.
फेस्टिव्हल मध्ये २ सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता ध्यान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर ‘कलाकार परिसंवाद’ होणार असून त्यात पद्मश्री सुधारक ओलवे, मोगाल्लान श्रावस्ती, सवी सावरकर, संजय जीवने सहभागी होणार आहेत. दुपारी ३:०० वाजता शिल्पकलेचे प्रदर्शन होईल तर सायंकाळी 5 वाजता क्रांतीमा आणि कबीर या नाटीकांचे सादरीकरण होणार आहे.
३ सप्टेंबर रोजीही सकाळी 10 वाजता ध्यान कार्यशाळा होईल त्यानंतर साहित्यिक परिसंवाद आयोजित करण्यात आला असून, पद्मश्री ग्नंवाग संपतेन, डॉ. विमलताई एस. थोरात, शाहीर संभाजी भगत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दुपारी ३:०० वाजता कॅलिग्राफी प्रदर्शन होईल तर सायंकाळी 5 वाजता स्टोरी शिवराज्याभिषेकाची या नाटकाचे सादरीकरण होणार आहे.
बालगंधर्व मंदिर परिसरातील विविध सभागृहांमध्ये हा महोत्सव पार पडणार असून, कला, साहित्य, चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील रसिकांसाठी हा महोत्सव पर्वणी ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. नाटकांसाठी विनामूल्य प्रवेशिका १ ते ३ सप्टेंबरदरम्यान सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत बालगंधर्व कलादालन येथे नोंदणी पश्चात उपलब्ध होतील. नोंदणी संकेत स्थळ https://urgyenartglobal.com/

Comments are closed.