महाराष्ट्रातील ३ हजार विद्यार्थ्यांचे ‘निरंजन’ने घेतले शैक्षणिक पालकत्त्व

पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्थेचा उपक्रम ; दुष्काळग्रस्त बीड सह अहिल्यानगर आणि पुणे जिल्हयातील विद्यार्थ्यांचा समावेश ; क्लिन सायन्स अ‍ँड टेक्नॉलॉजीचे विशेष सहकार्य

पुणे : दुष्काळग्रस्त बीड सह अहिल्यानगर आणि पुण्यासह आजूबाजूच्या ग्रामीण भागात शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करीता महाराष्ट्रातील ३ हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्थेने घेतले आहे. क्लिन सायन्स अ‍ँड टेक्नॉलॉजीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून पुणे आणि परिसरातील तब्बल २९ शाळांमधील २ हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट प्रदान कार्यक्रम बुधवार, दिनांक १५ जुलै रोजी सकाळी १० वाजता स्वारगेटजवळील गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. नवनीत मानधनी यांनी दिली.

 

शैक्षणिक किट प्रदान कार्यक्रमाला पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच क्लिन सायन्स अ‍ँड टेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालक कृष्णकुमार बूब, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

 

संस्थेचे सचिव सीए दुर्गेश चांडक म्हणाले, गरजू व गरीब मुलांचे शैक्षणिक पालकत्त्व घेण्याचे कार्य संस्था अनेक वर्षे करीत आहे. शैक्षणिक किट मध्ये १६ प्रकारच्या वस्तू असून या प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात येणार आहेत. यामध्ये सॅक, छत्री, भूमिती बॉक्स, टोपी, पॅड, पेन्सिल बॉक्स, डबा, रजिस्टर, चित्रकला वही, एकेरी वह्या – २०० पानी व ५२ पानी, दुरेघी वह्या – ५२ पानी, पाण्याची बाटली, बॉल पेन, रंगीत पेन अशा वर्षभर पुरेल अशा वस्तूंचा समावेश आहे.

 

कार्याध्यक्ष भारत वेदपाठक म्हणाले, चिमुकल्यांच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश पडावा आणि भविष्याच्या वाटा उज्ज्वल व्हाव्या, याकरीता संस्थेने बीडमधील दुष्काळग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेण्याच्या उपक्रमाला २०१२ साली सुरुवात केली. त्यानंतर पुणे, रायगडसह तोरणा, लोहगड, तुंग मधील व मुळशीतील नांदगाव मधील जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारले. त्यापाठोपाठ जम्मू-काश्मिरमधील आणि अहिल्यानगर मधील गरजू विद्यार्थ्यांना यामध्ये समाविष्ट करुन घेण्यात आले.

 

सामाजिक बांधिलकी म्हणून मदत देण्यास अनेकजण इच्छुक असतात, परंतु त्यांना योग्य व्यासपीठ आणि दिशा मिळणेही तितकेच गरजेचे आहे. लहान मुलांचे शाळेत जाऊन शिकण्याचे आणि खेळण्याचे वय असूनही केवळ पैशाअभावी शिक्षण घेता येत नसल्याची परिस्थिती अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे निरंजन सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट प्रदान केले जाते. यावर्षी महाराष्ट्रातील ७५ हून अधिक शाळा व संस्थांतील विद्यार्थ्यांचा या उपक्रमात समावेश करण्यात आल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले. याशिवाय गरजूंना सायकल ची मदत, ग्रामीण भागातील शाळा डिजिटल करण्यास पुढाकार, विविध शाळांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ तसेच महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने शिलाई मशीन व पिठाची गिरणी वाटप कार्यक्रम देखील संस्था सातत्याने घेत आहे.

 

Comments are closed.

Translate »