पायलट होण्याच्या स्वप्नांना मिळाली दिशा; पुण्यात CPL मेगा सेमिनार उत्साहात संपन्न

पुणे : विमानवाहतुकीत करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी आयोजित “पायलट अॅप्टिट्यूड टेस्ट व कमर्शियल पायलट लायसन्स (CPL)” या विषयावरील मेगा सेमिनार आज 5 एप्रिल 2026 रोजी पुण्यात उत्साहात पार पडला. यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमी यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

शिवाजीनगर येथील डॉ. बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरी येथे झालेल्या या सेमिनारमध्ये पुणे व परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विमानवाहतूक क्षेत्रातील वाढत्या संधींमुळे तरुणांमध्ये या क्षेत्राबद्दल मोठी उत्सुकता असल्याचे यावेळी दिसून आले.

या सेमिनारमध्ये कॅप्टन नितीन बेंद्रे, रश्मी इंदुलकर, शाम वैद्य, कॅप्टन अतुल वास्कले, कॅप्टन अकिन घोडेश्वर, फिलिपिन्स फ्लाइंग स्कूलचे कॅप्टन पुनीत वाखारिया तसेच पोलंड फ्लाइंग स्कूलचे पार्थ पटेल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी पायलट होण्यासाठी आवश्यक पात्रता, प्रशिक्षण प्रक्रिया, खर्च तसेच देश-विदेशातील करिअर संधी याबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी बोलताना कॅप्टन बेंद्रे म्हणाले, “बारावीनंतर विद्यार्थी या क्षेत्रात करिअर करू शकतात. यासाठी भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय बंधनकारक आहेत.या क्षेत्रात प्रवेश करताना सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आहे. या क्षेत्रात अनेक गैरसमजुती दूर करून योग्य ते मार्गदर्शन यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमीमार्फत सातत्याने दिले जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. या क्षेत्रात कार्यरत होण्यासाठी तरुणांची संख्या कमी असल्याने भारताबाहेरील युवकांना रोजगारासाठी आमंत्रित करण्याची वेळ आली आहे, ही खेदजनक बाब आहे. त्यामुळेच आजच्या काळात विमान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे,” असे प्रतिपादन यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमीचे संस्थापक कॅप्टन नितीन बेंद्रे यांनी केले.

यावेळी पायलट अॅप्टिट्यूड टेस्टची तयारी कशी करावी याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे समाधान करण्यात आले. या उपक्रमामुळे विमानवाहतुकीत करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळाली असून, अशा प्रकारच्या मार्गदर्शनपर उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Comments are closed.

Translate »