व्हॅलेंटाईन डे ला शालेय विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरणाचा संदेश; ‘वनराई पर्यावरण बालोत्सव’ थाटामाटात संपन्न
पुणे: एकीकडे तरुणाई व्हॅलेंटाईन डे साजरा करत असताना दुसरीकडे शालेय विद्यार्थ्यांनी पर्यावरण जनजागृतीचा संदेश देत हा दिवस साजरा केला. पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘वनराई पर्यावरण बालोत्सव’ उत्साहात आणि थाटामाटात पार पडला. पथनाट्य आणि लोककला स्पर्धांतील प्रत्येकी प्रथम तीन विजेत्या संघांनी प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. भारूड, पोवाडा, कीर्तन आणि पर्यावरण विषयक गीते यांमधून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा विचार मांडला. विजेत्या विद्यार्थ्यांनी गावागावांमध्ये जाऊन पर्यावरण जनजागृती करण्याची ग्वाही दिली. टिळक स्मारक मंदिर येथे झालेल्या या आंतरशालेय पर्यावरण सांस्कृतिक सोहळ्यात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. ‘नाळ’ चित्रपटातील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते बालकलाकार श्रीनिवास पोकळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
वनराईतर्फे दरवर्षी पर्यावरण जनजागृतीसाठी विविध स्पर्धा घेतल्या जातात, यंदा प्रथमच पथनाट्य आणि लोककला स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता. एकूण ७० शाळांनी सहभाग नोंदवला असून त्यापैकी ३० शाळा अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या. शिक्षकांनी सुंदर पद्धतीने रचलेली आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेली सादरीकरणे लक्षवेधी ठरली.
या वेळी वनराईचे विश्वस्त रोहिदास मोरे, सागर धारिया, सचिव अमित वाडेकर, अकोला जिल्हाप्रमुख बबनराव कानकिरड, जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद शहा, प्रा. वसंत बंग आदी मान्यवर उपस्थित होते. स्व. डॉ. मोहन धारिया स्मृती पुरस्कार, स्व. अण्णासाहेब बेहरे स्मृती पुरस्कार आणि स्व. तुळसाबाई सातारकर स्मृती पुरस्कार यांसारख्या मानाच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमासाठी इंदिरा बेहेरे चॅरिटेबल ट्रस्ट आणि महाराष्ट्र फाउंडेशन, अमेरिका यांचे सहकार्य लाभले.
शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून पर्यावरण संवर्धन व शाश्वत ग्रामीण विकासाचा कार्यविस्तार पुढील पिढ्यांपर्यंत नेण्यासाठी ‘वनराई’ची पर्यावरण वाहिनी कार्यरत आहे. लहान मुलांमध्ये पर्यावरण संवर्धनाची बीजे रोवून त्यांना संवेदनशील व कृतीशील बनविणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सागर धारिया यांनी बालमनावर पर्यावरणाचे संस्कार रुजविण्यासाठी शिक्षकांनी कृतीशील सहभाग घ्यावा, परिसर स्वच्छ व प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि पर्यावरण सक्षम पिढी घडविण्यासाठी कार्य करावे, असे आवाहन केले.
अमित वाडेकर यांनी सांगितले की, २००२ पासून शाळा-शाळांमध्ये वनराई इको क्लबद्वारे कार्यक्रम राबवले जात असून निबंध, चित्रकला, सांस्कृतिक स्पर्धा, टाकाऊपासून टिकाऊ, स्वच्छ-सुंदर शाळा, औषधी वनस्पती बाग, जलसंवर्धन, वृक्षारोपण आणि घनकचरा व्यवस्थापन अशा विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाचे संस्कार रुजवले जात आहेत.
पर्यावरणीय उत्साहाने भारलेला हा सोहळा विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी आविष्कार ठरला.

Comments are closed.