माजी नगरसेवक अमोल बालवडकरांचे तिकीट का कापले? चंद्रकांत पाटील यांचा स्फोटक खुलासा; व्हायरल व्हिडिओ ठरला निर्णायक
पुणे | पुणे महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ९ (सुस–बाणेर–पाषाण) सध्या पूर्णपणे हाय व्होल्टेज बनला असून, भाजपच्या उमेदवारी निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचे तिकीट कापून लहू बालवडकर यांना उमेदवारी दिल्याने सुरू झालेला वाद आता गंभीर आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे. अमोल बालवडकर यांनी पक्षाकडून अन्याय झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत अमोल बालवडकर यांचे तिकीट कापण्यामागील कारण स्पष्ट करत थेट ‘व्हायरल व्हिडिओ’चा मुद्दा समोर आणला. अमोल बालवडकर यांचे कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत आणि स्वच्छ प्रतिमेचे नेतृत्व आहे. गृह खात्याच्या माध्यमातून त्यांना योग्य आणि संवेदनशील माहिती मिळाली होती. जर अमोल बालवडकर यांना तिकीट दिले असते आणि निवडणुकीदरम्यान हे व्हिडिओ समोर आले असते, तर पक्षाची मोठी प्रतिमा मलिन झाली असती. त्यामुळे वेळेत निर्णय घेऊन तिकीट कापण्यात आले.”
ते पुढे म्हणाले की, पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने तब्बल ४२ माजी नगरसेवकांची तिकीटे कापली असून, प्रत्येक निर्णयामागे ठोस कारणे होती. “आमच्या पक्षात मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याची परंपरा नाही. योग्य माहितीच्या आधारे मुख्यमंत्री फडणवीस यांनी वेळेत निर्णय घेतला,” असे स्पष्ट करत त्यांनी अप्रत्यक्षपणे पक्षशिस्तीचा मुद्दाही अधोरेखित केला.
या प्रकरणाला आणखी धार देत चंद्रकांत पाटील यांनी निलेश घायवळसोबत फोटो किंवा व्हिडिओ असलेल्या इतर व्यक्तींविरोधातही माहिती गोळा करून ती मुख्यमंत्र्यांकडे देणार असल्याचे जाहीर केले. गरज पडल्यास चौकशीची मागणी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले

Comments are closed.