डाॅक्टरांनी पैशांसोबत आदर देखील कमावला पाहिजेसामाजिक कार्यकर्ते डॉ.मिलिंद भोई : मंगल फाउंडेशन च्या वतीने सुश्रुत पुरस्कार सोहळा

पुणे : वैद्यकीय व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे आणि ती डॉक्टर सहज मिळवतात; परंतु आज जी गोष्ट हरवली आहे ती म्हणजे वात्सल्य. कौशल्यापेक्षा वात्सल्य अधिक महत्त्वाचे आहे. मेंदूचा वापर करताना मनानेही विचार करणे आवश्यक आहे. रुग्ण जेव्हा डॉक्टरांकडे येतो, तेव्हा त्याची आर्थिक स्थिती पाहून उपचारांचे बजेट दिले जाते, हे बदलण्याची आज गरज आहे. हे परिवर्तन ज्यांनी साध्य केले आहे अशा डॉक्टरांचा सन्मान ‘सुश्रुत पुरस्कार’ द्वारे केला जात आहे. डॉक्टर पैसा कमवत आहेत, पण त्याबरोबरच आदर देखील कमावला पाहिजे, असे मत सामाजिक कार्यकर्ते डाॅ. मिलिंद भोई यांनी व्यक्त केले.

मंगल फाउंडेशन च्या वतीने सुश्रुत पुरस्कार सोहळ्याचे आयोजन कोंढवा येथील इस्कॉन मंदिराच्या हॉल क्रमांक ४ मध्ये करण्यात आला होते. आयुर्वेद आणि प्रॉक्टोलॉजी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा गौरव यावेळी झाला. यंदाचा जीवन गौरव पुरस्कार गुजरात आयुर्वेद विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मुकुल पटेल आणि अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, आयुष मंत्रालय चे संयुक्त संचालक डॉ. उमेश तगडे यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जेष्ठ विधिज्ञ अॅड. प्रताप परदेशी, जालिंदर कामठे, प्रशांत जगताप, रंजना टिळेकर यांसह मंगल फाउंडेशनचे डॉ. कुणाल कामठे, डॉ. शर्मिला कामठे उपस्थित होते. डॉ. कामठे पाइल्स क्लिनिकच्या सहकार्याने पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

सुश्रुत रत्न पुरस्कार संजीवनी आयुर्वेद महाविद्यालयाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीनिवास के. बन्निगोल, अश्विनोउ हॉस्पिटल, माळशिरसचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रवीण पाटील आणि श्री विश्वमूर्ती आयुर्वेद चिकित्सालय, पुणेचे संस्थापक डॉ. चंद्रकुमार देशमुख यांना तर प्रॉक्टोलॉजी क्षेत्रातील असाधारण कार्याबद्दल यशोदीप पाइल्स हॉस्पिटल, चिखलीचे डॉ. गोपाल लोखंडे, बावधन मेडिकेअर सेंटर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील अंभोरे यांना सन्मानित करण्यात आले. आयुर्वेद आयकॉन पुरस्कार गाडे आय हॉस्पिटल, मंचरचे डॉ. सचिन गाडे आणि आयुर्विंग्स हेल्थकेअर च्या संस्थापिका डॉ. पूजा कोहली यांना प्रदान करण्यात आला.

डॉ. कुणाल कामठे म्हणाले की, पाईल्सविषयी समाजात जनजागृती करणे अत्यंत गरजेचे आहे. पाईल्सबाबत लोकांमध्ये अजूनही लज्जा व भीती आहे, आणि ती दूर करणे आवश्यक आहे. यासाठी योग्य प्रकारचे लेबलिंग आणि जागरूकता मोहिमा राबविणे महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने ‘विश्व पाईल्स दिवस’ साजरा केला जातो. आपल्या समाजात अभिमान वाटावा असे अनेक उत्तम वैद्य आहेत, आणि त्यांचा सन्मान करताना आम्हाला आनंद होतो. दुर्दैवाने, काही ठिकाणी उपचारांच्या नावाखाली अघोरी पद्धतींचा वापर करणारे लोकही आढळतात. अशा चुकीच्या उपचारांना आळा बसणे गरजेचे आहे.

सर्व पुरस्कार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. शर्मिला कुणाल कामठे यांनी आभार मानले.

Leave A Reply

Translate »