कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेने पटकावले विजेतेपदसहकार करंडक क्रिकेट स्पर्धेत मारली बाजी ; पुणे नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनच्या वतीने आयोजन

0


पुणे : गोलंदाजांनी केलेल्या अचूक मा-यानंतर मयुरेश जाधवची फटकेबाजी आणि रणजित जगतापची अष्टपैलू कामगिरी या जोरावर कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेने पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सर्व नागरी सहकारी बँकांसाठी आयोजित आंतरसहकारी बँक सहकार करंडक क्रिकेट स्पर्धेत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (पीडीसीसी) नऊ गडी राखून मात केली आणि विजेतेपद पटकावले.

नेहरू स्टेडियममध्ये ही अंतिम लढत झाली. पीडीसीसी बँकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित १० षटकांत ९ बाद ८१ धावा केल्या. यातील आघाडीच्या तिघांना खातेही उघडता आले नाही. सलामीवीर शार्दूल शिंदेने सर्वाधिक २७ धावा केल्या. तळाच्या संतोष दुरगडेने नाबाद २४ धावा करून पीडीसीसी बँकेला ८० धावांचा टप्पा ओलांडून दिला.

कॉसमॉस बँकेच्या रणजित जगतापने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. यानंतर कॉसमॉस बँकेच्या रोहित ओव्हाळ आणि मयुरेश जाधव यांनी आक्रमक सुरुवात केली. मयुरेश ३६ धावा करून बाद झाला. यानंतर रोहितने रणजित जगतापच्या साथीने ७.१ षटकांत कॉसमॉसला विजय मिळवून दिला. रोहितने नाबाद २३, तर रणजितने नाबाद १८ धावांची खेळी केली. लढतीत तीन गडी बाद करून नाबाद १८ धावा करणा-या रणजितला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

पारितोषिक वितरण महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबई चे मुख्य प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते झाले. दि कॉसमॉस को-ऑप. बँक लि. चे मंदार जोशी, कर्णधार निखिल शेवाळे यांनी विजेतेपदाचे पारितोषिक स्वीकारले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष निलेश ढमढेरे, उपाध्यक्ष रमेश वाणी, मानद सचिव अॅ’ड. सुभाष मोहिते, असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत शेळके, प्रशिक्षण विभाग समन्वयक जितेंद्र पायगुडे यांसह विविध बँकांचे अजित गिजरे, बाबुराव शितोळे, अनिल गाडवे, राजेश कवडे, सुनील रुकारी, दिनेश ओसवाल, श्रीकांत तिखे, जुगलकिशोर पुंगालिया, निशा करपे, शिरीष मोहिते, अनिरुद्ध देसाई, साधू बनकर, दिपक घाडगे, अजय रजपुत, यशवंत भुजबळ आदी उपस्थित होते.

विजेत्या संघाला रोख २५ हजार रुपये व चषक आणि उपविज्येत्या संघाला रोख १५ हजार रुपये व चषक प्रदान करण्यात आले. प्रत्येक सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू सह सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर अशी वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात आली.

सर्वोत्कृष्ट फलंदाज – शार्दूल शिंदे (पीडीसीसी) – १३१ धावा, १८१.९४ स्ट्राइक रेट
सर्वोत्कृष्ट गोलंदाज – रणजित जगताप (कॉसमॉस बँक) – ७ गडी बाद
मालिकावीर – मयुरेश जाधव (कॉसमॉस बँक) – ६ गडी बाद, १०१ धावा. ५ झेल, १ धावबाद

  • धावफलक – पीडीसीसी – १० षटकांत ९ बाद ८१ (शार्दूल शिंदे २७, संतोष दुरगडे नाबाद २४, नितीन थोरात १३, रणजित जगताप २-०-१०-३, निखिल शेवाळे २-०-१५-२, प्रतीक पटवर्धन २-०-२५-१, प्रसाद शिंदे २-०-११-१, मयुरेश जाधव २-०-१९-१) पराभूत वि. कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक – ७.१ षटकांत १ बाद ८५ (रोहित ओव्हाळ नाबाद २३, मयुरेश जाधव ३६, रणजित जगताप नाबाद १८, रोहित केदार २-०-२९-१). सामनावीर – रणजित जगताप.

Leave A Reply

Your email address will not be published.

Translate »