दृष्टीहीनांनी कारचालकांना दाखवला ‘डोळस’ मार्ग
पुणे: हातात स्मार्टफोन, कानावर पडणाऱ्या सूचना, त्यानुसार कारचालकांना चतुरपणाने मार्ग दाखवत, २२ किलोमीटरची रॅली ‘डोळस’ पूर्ण करत दृष्टीहीन बांधवांनी आनंद साजरा केला. ५० दृष्टीहीन बांधवांनी कारचालकांना गाडी चालवण्याचा मार्ग दाखवत आपण सक्षम आहोत, याची जाणीव करून दिली. ‘अपंगत्व म्हणजे असमर्थता नव्हे’ हा सामाजिक संदेशही यातून दिला गेला.

निमित्त होते, सामाजिक समावेशकतेला चालना देण्यासाठी राउंड टेबल इंडिया या संस्थेतर्फे दृष्टीहिनांसाठी आयोजित ‘बियॉंड साईट’, या आगळ्यावेगळ्या कार रॅलीचे! नेक्सा-महालक्ष्मी ऑटो येथून निघालेली ही रॅली अमनोरा पार्क, खराडी बायपास, शक्ती स्पोर्ट्स, हयात इन्स्टा, गोल्ड ऍडलॅब चौक, वर्दे सोसायटी, गुंजन टॉकीज, कोरेगाव पार्क, वेस्टीन हॉटेल, मुंढवा चौक, मगरपट्टामार्गे द फर्न क्लब, अमनोरा पार्क येथे समाप्त झाली.
राउंड टेबल इंडियाचे (एरिया १५) अध्यक्ष अंशुल मंगल, पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशनच्या शेनाज पन्नू, राउंड टेबल इंडियाचे कीर्ती रुईया, सुमित गुप्ता, ऋषभ पतोडीया, रोनक पतोडीया, मनन शहा, गौरव अग्रवाल, गुरप्रीत सिंग, ‘नेक्सा’चे तरुण सिंग आदी उपस्थित होते. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या ‘एक्झीम’चे संचालक पीसी नाम्बियार व अंशुल मंगल यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात झाली.
अंशुल मंगल म्हणाले, “राउंड टेबल इंडियाच्या वतीने पुण्यात प्रथमच या अनोख्या कार रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमध्ये ५० कारचालक सहभागी झाले होते. त्यांना दृष्टिहीन व्यक्ती स्मार्टफोनवरून मिळणाऱ्या सूचना ऐकून मार्ग दाखवत होते. राउंड टेबल इंडियाच्या सदस्यांनी या कारमध्ये बसून प्रवास केला. दीड तासाच्या या रॅलीत २२ किलोमीटरचे अंतर यशस्वीपणे पूर्ण केले. ‘बियाँड साइट’ ही केवळ स्पर्धा नाही, तर दृष्टिहीन व्यक्तींच्या कौशल्यावर विश्वास दाखवण्यासह त्यांच्याविषयी असलेल्या रूढ कल्पनांना छेद देणारा उपक्रम आहे. दृष्टिहीन व्यक्तींची दिशा ज्ञान, स्थानिक समज आणि संवाद कौशल्ये अफाट असल्याचे यातून दिसले.”
दृष्टीहीन तरुण-तरुणींनी या रॅलीचा मनसोक्त आनंद घेतला. त्यांनाही याबाबत खूप उत्सुकता होती. दृष्टिहीनांच्या अद्भुत कौशल्यांना चालना देणारा हा उपक्रम आहे. ‘बियाँड साइट’च्या माध्यमातून अनेकांचे दृष्टिकोन बदलतील आणि दृष्टिहीनांसाठी अधिक समावेशक संधी निर्माण होतील, अशी आशा आहे,” असे शेनाज पन्नू यांनी सांगितले.
सहभागी दृष्टीहीन मुलामुलींनी भावना व्यक्त करताना हा अद्भुत अनुभव असल्याचे सांगितले. यातून खूप गोष्टी शिकता आल्या. कार चालवल्याचे समाधान लाभले. राउंड टेबल इंडियामुळे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आम्हाला आज हा अनुभव घेता आला, यासाठी त्यांचे आभार मानले.