उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने स्टार्ट अप एक्स्पोचे आयोजन

येत्या १० एप्रिल रोजी एमआयटी- डब्लूपीयु येथे संपन्न होणार पुणे स्टार्टअप एक्स्पो २०२५

पुणे: प्रगतीशील भारताच्या दिशेने वाटचाल करीत असताना उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने गुरुवार दि. १० एप्रिल रोजी ‘पुणे स्टार्टअप एक्स्पो २०२५’ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती एक्स्पोच्या आयोजिका अमृता देवगांवकर यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डेस्टिनेशन को वर्किंग, पुणे बिझनेस अँड इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुप, टीडीटीएल, एमआयटी- डब्लूपीयु यांच्या वतीने सदर एक्स्पोचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी अमृत श्रोत्री, सीमा काळे, नीलिमा अलूलकर, मानसी ठाकूर, दीपा बडवे, कृष्णन वर्मा, गार्गी कुलकर्णी आणि सर्वेश मेहेंदळे हे उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया उपक्रमातील स्टार्ट अप इंडियाचाच एक भाग म्हणून या एक्स्पोचे आयोजन सकाळी ९:00 ते सायं ६:00 च्या दरम्यान कोथरूड येथील एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या आवारात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. सदर एक्स्पो सर्वांसाठी विनामूल्य खुला असून त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.  

याविषयी अधिक माहिती देताना अमृता देवगांवकर म्हणाल्या, “या उपक्रमामुळे राज्याच्या विविध भागातील नवोदितांच्या स्टार्टअप्सना एक व्यासपीठ तर विद्यार्थ्यांना आपली कौशल्ये दाखविण्याची संधी मिळणार आहे. या एक्सपोच्या निमित्ताने काही स्टार्टअप्स उद्योजकांना आपल्या नवकल्पना सादर करण्याची, बाजारात आपली ओळख वाढवण्याची व आपल्या स्टार्टअपला गती देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन देखील मिळेल.”

या एक्स्पोमध्ये सहभागी होण्याविषयी माहिती देताना अमृता देवगांवकर म्हणाल्या, “राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने हा एक्स्पो आयोजित होत असून यामध्ये विद्यार्थी आणि स्टार्ट अप्स सहभागी होऊ शकतात. यामध्ये विद्यार्थ्यांना एक्स्पोच्या https://punestartupexpo.com/ या संकेतस्थळावर जाऊन आपल्या स्टार्ट अपच्या कल्पनेची नोंदणी करायची आहे. येथे विद्यार्थी त्या कल्पनेबद्दल पीपीटी प्रेझेंटेशन, सविस्तर माहिती अथवा व्हिडिओ अपलोड करू शकतात. यानंतर आयोजकांच्या वतीने सर्वोत्तम स्टार्ट अप कल्पनांची निवड करण्यात येईल. याशिवाय १० एप्रिल रोजी होणाऱ्या एक्स्पोमध्ये सर्वोत्तम कल्पनांना बक्षिसे देखील देण्यात येतील. याबरोबरच या संकल्पना विद्यार्थ्यांना उद्योजक, एक्स्पर्ट आणि मेंटर यांपुढे ठेवत त्यावर नजीकच्या भविष्यात कामही करता येईल.”

स्टार्ट अपसाठी देखील संकेतस्थळाच्या माध्यमातून नोंदणी प्रक्रिया सुरु असून त्यांना येथे आपल्या स्टार्ट अपची माहिती देऊन गुंतवणूकदार, मेंटर आणि उद्योजकांशी चर्चा करता येईल. स्टार्ट अपमधील सर्वोत्तम स्टार्ट अप हे येत्या १० एप्रिल च्या एक्स्पोमध्ये सादर केले जातील आणि या ठिकाणी त्यांना थेट गुंतवणूदारांना आपल्या स्टार्ट अपची माहिती देता येईल. शिवाय या एक्स्पोमध्ये अनेक उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, मेंटर यांच्याशी देखील त्यांना थेट संवाद साधता येणार आहे. स्टार्टअपसाठी संकेतस्थळावर एआय-एमएल, फॅशन, अॅग्रीकल्चर अँड फूड, एंटरटेन्मेंट अँड मिडीया, बांधकाम व्यवसाय क्षेत्र आणि हेल्थकेअर व बायोटेक असे विभाग करण्यात आले असून यामुळे जास्तीत जास्त स्टार्ट अप यासाठी नोंदणी करू शकतात.”

१० एप्रिल रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या वेळेत चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुणे स्टार्ट अप एक्स्पोचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न होईल. यानंतर दुपारच्या सत्रात सहभागी स्टार्ट अप्सना थेट गुंतवणूकदारांना आपले स्टार्ट अप दाखवित त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करण्याची संधी मिळेल, अशी माहितीही अमृता देवगांवकर यांने दिली

Leave A Reply

Translate »