कैवल्यधाम, लोणावळा येथे राष्ट्रीय योग संमेलनात झाला विविध धर्मीय ऐक्याचा उत्सव जागर

लोणावळा (पुणे) कैवल्यधाम येथे आज राष्ट्रीय योग संमेलन, “योग – एक सांस्कृतिक स्वरसमन्वय, आध्यात्मिक परिमाण” या दोन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात विविध धर्मातील आध्यात्मिक गुरूंनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जैन, हिंदू, बौद्ध, इस्लाम, ख्रिश्चन आणि पारशी धर्माच्या आध्यात्मिक गुरूंनी योग या विषयाबद्दल आपले विचार मांडले आणि चर्चा केली.

हरिद्वार येथील सुरतगिरी बंगलाचे अध्यक्ष आणि मुंबईतील संन्यास आश्रमचे अध्यक्ष स्वामी विश्वेश्वरानंद गिरी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय योग संमेलनाचे उद्घाटन झाले. तसेच या प्रसंगी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेले जैन आध्यात्मिक गुरू, अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक अध्यक्ष आचार्य लोकेश मुनि, तिबेटी बौद्ध लामा व आध्यात्मिक मार्गदर्शक चोक्योंग पाल्गा रिनपोचे, मुंबईतील द योगा इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष मा हंसा जी योगेंद्र आणि शताब्दी समितीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री श्रीयुत सुरेश प्रभू हे मान्यवरही उपस्थित होते.

उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान कैवल्यधामचे अध्यक्ष डॉ. ओ. पी. तिवारी यांनी भूषवले, तर महामहोपाध्याय रिनपोचे यांचे बीजभाषण झाले. दोन दिवसीय या कार्यक्रमाचा समारोप बिहार स्कूल ऑफ योगचे पद्मभूषण परमहंस स्वामी निरंजनानंद सरस्वती यांच्या उपस्थितीत होणाऱ्या समारोप सत्राने होईल.

कैवल्यधामचे अध्यक्ष डॉ. ओ. पी. तिवारी म्हणाले, “योग हा विविध समुदाय, प्रांत, परंपरा आणि धर्म यांच्यामधील सांस्कृतिक ऐक्य साधणारा एकत्वाचा शक्तिशाली आधार आहे. या संमेलनात विविध धर्मातील प्रबुद्ध आध्यात्मिक गुरु त्यांच्या विचारांची मांडणी करण्यासाठी उपस्थित आहेत, याबद्दल आम्ही आभारी आहोत. या सत्रांतून सर्व सहभागींना योगाच्या माध्यमातून जीवनातील उच्च उद्दिष्ट साध्य करण्याबाबत मौल्यवान शिकवण मिळेल.”

योग हा शिक्षण आणि साधनेच्या माध्यमातून आध्यात्मिक विकासासाठी एक महत्त्वाचा उत्प्रेरक आहे, यावर चर्चा करण्यात आली. या चर्चासत्रांमध्ये आध्यात्मिक गुरु आणि प्रख्यात विद्वानांनी दिलेल्या अनुभवसत्रांतून सहभागींना ज्ञान मिळाले. इतर मान्यवर वक्त्यांमध्ये अर्ज विद्या गुरुकुलचे संस्थापक स्वामी परमात्मानंद सरस्वती, प्रख्यात विद्वान आणि माजी खासदार डॉ. सत्य पाल सिंह, योग साधना मंदिरचे संस्थापक डॉ. सबीर शेख, जागतिक वेलनेस गुरु डॉ. मिकी मेहता, आणि लोणावळ्यातील डॉन बॉस्कोचे एसडीबी-रेक्टर डायरेक्टर फादर ब्लानी पिंटो यांचा समावेश होता.

1924 मध्ये स्वामी कुवल्यानंद यांनी स्थापन केलेले कैवल्यधाम हे जगातील एक अग्रगण्य आणि सर्वात जुने योग संस्थान आहे. पतंजलींच्या अष्टांग योगाच्या तत्त्वे आणि तत्त्वज्ञानाचे पालन करत कैवल्यधाम पारंपारिक योग शुद्ध स्वरूपात शिकवते. योगाचे फायदे आणि उपयोग वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध करणारे हे पहिले योग संस्थान आहे.

Leave A Reply

Translate »