काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकराचे आरोप बिनबुडाचा?, पोलीस आयुक्तांनी सांगितल सत्य; सहकारनगरमध्ये नेमकं काय घडल?

पुणे: पुणे लोकसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडणार आहे. मतदानासाठी अवघे काही तास उरले असताना काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत सहकारनगर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू केल आहे. धंगेकर यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपानंतर भाजपने देखील आक्रमक पवित्रा घेतला असून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली. याबद्दल बोलताना अमितेश कुमार यांनी धंगेकर यांच्या तक्रारीनुसार तपास केल्यानंतर सहकार नगर भागामध्ये कोणत्याही प्रकारचे पैसेवाटप होत नसल्याचं तपासात उघड झाल्याची माहिती दिली आहे.

काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सहकार नगर परिसरामध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला आहे. तसेच पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन सुरू केल आहे. दुसरीकडे धंगेकर यांना पराभव दिसू लागल्याने नागरिकांना संभ्रमित करण्यासाठी अशा प्रकारची स्टंटबाजी केली जात असून, कसबा पोटनिवडणुकीत देखील त्यांनी अशाच प्रकारे पैसे वाटप होत कांगावा केला होता, असा आरोप
भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केला आहे. घाटे यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.

धंगेकरांच्या तक्रारीवर नेमकं काय म्हणाले पोलीस आयुक्त

सहकार नगर पोलीस ठाण्यामध्ये पैसे वाटप होत असल्याची एक तोंडी तक्रार प्राप्त झाली होती, मात्र कोणताही पुरावा देण्यात आलेला नव्हता. स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी पथकासोबत घटनास्थळी भेट दिली. सर्व प्रकारची चौकशी करण्यात आल्यानंतर तक्रारीमध्ये काही तथ्य नसल्याचे पुढं आलं आहे. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला नाही. काही वेळापूर्वी काँग्रेसचे उमेदवार पोलीस स्टेशनच्या परिसरात बसले असून गुन्हा दाखल करण्याची ते मागणी करत आहेत. मात्र कोणताही पुरावा नसताना गुन्हा दाखल करता येत नाही, हे पोलिसांनी त्यांना सांगितलं आहे. तरीही केवळ त्यांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ते करत आहेत. बेकायदेशीरपणे त्यांनी लोक जमवले असून पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला असल्याचं पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे.

Leave A Reply

Translate »