राजकारणात कितीही पक्ष आले तरी आपण झाडांच्या पक्षावर प्रेम करूया – ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांचे मत

पहिला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समर्पण पुरस्कार केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सयाजी शिंदे यांना प्रदान

पुणे : कोणताही राजकीय नेता, नट किंवा शास्त्रज्ञ सावली देत नाही किंवा फळ ही देत नाही. त्यामुळे माझ्या मते झाड हा खरा सेलिब्रिटी आहे. झाड आपल्याला मरेपर्यंत ऑक्सिजन देत त्यामुळे आई आणि झाड यापेक्षा मोठं काही नाही. तसेच राजकारणात कितीही पक्ष आले तरी आपण झाडांच्या पक्षावर प्रेम करूया कारण झाडांचा पक्ष टिकणारा आहे, असे मत अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणी शिवाय जर कोणी वेगळा विचार करत असेल तर, त्यांना पुढे खूप अवघड जाईल, अशी स्पष्ट भूमिकाही मांडली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील उत्तुंग योगदान आणि सामाजिक कार्य लक्षात घेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समर्पण पुरस्कार समितीच्या वतीने ‘समर्पण पुरस्कार’ सुरू करण्यात आला आहे. यंदाचा पहिला समर्पण पुरस्कार संवेदनशील अभिनेते सयाजी शिंदे यांना  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि राज्याचे उच्च व तंत्रज्ञान मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते  प्रदान करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना शिंदे बोलत होते. १ लाख ११ हजार रुपये, पुणेरी पगडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती व  मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे होते. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समर्पण पुरस्कार समितीचे राजेश पांडे, ॲड. मंदार जोशी, बाळासाहेब जानराव, सुनील महाजन, मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना सयाजी शिंदे म्हणाले, माझ्यातील कलाकाराचा खरा प्रवास हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीलाच सुरू झाला. जेव्हा मी कॉलेजला होतो तेव्हा नाईट वॉचमनची नोकरी करायचो. तेव्हा विद्रोही कविता खूप ऐकायला मिळायच्या. नामदेव ढसाळ व दया पवार यांच्या कविता माझ्या तोंडापाठ होत्या. तेव्हा झाडं सुद्धा खूप होती. मात्र आता तीच झाड दिसतं नाहीत. फक्त ओसाड माळरान आणि लांब रस्ते दिसतात. आपण आपल्या पुढच्या पिढीला काय देवून जाणार? म्हणून आम्ही सह्याद्री देवराईच्या माध्यमातून वृक्षारोपणाला सुरूवात केली. सध्या औरंगाबाद येथे ६७ जुन्या झाडांच्या पुनःरोपणाचे काम सुरू आहे.

अनेक सेलिब्रिटींनी खूप काम केल्यानंतर जलसिंचन, वृक्षारोपण, पर्यावरण आशा मूलभूत विषयावर काम करण्यास सुरूवात केली आहे. सयाजी शिंदे ही त्यापैकीच एक, असे सांगत चंद्रकांतदादा  पाटील म्हणाले, सयाजी शिंदे यांचे काम ऐकल्यावर मी तर चकीतच झालो. त्यांच्या या वृक्षारोपणाच्या कामाला हातभार म्हणून आम्ही गुवाहाटी आयआयटी, आसामच्या धर्तीवर पुण्यात पहिली ‘ट्री अॅम्ब्युलेन्स’ सुरू करणार आहोत, अशी घोषणा पाटील यांनी केली. तसेच सह्याद्री देवराई या संस्थेवर एक फिल्म बनवणार असल्याचे ही जाहीर केले.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले म्हणाले, वृक्ष जसे जास्त दिवस जगतात तसे आपण जगले पाहिजे. मात्र असंतुलित  पर्यावरणामुळे नागरिक जास्त वर्षे जगत नाही. पूर्वी  भरपूर झाडं होती मुबलक ऑक्सिजन होता. त्यामुळे माणसं जास्त दिवस जगायची. मात्र आता व्हेंटिलेटरच्या ऑक्सिजनची गरज लागते. डॉ. आंबेडकरांनी शिकवलं आहे की पक्ष, जात, धर्म, पंथापेक्षा देश महत्वाचा आहे, अन् देश वाचवायचा असेल तर झाडं वाचवली पाहिजेत.

आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना डॉ. सदानंद मोरे म्हणाले, वृक्ष हा संपूर्ण पर्यावरणाचा पाया आहे. त्याचे आपण रक्षण केले तर पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. लोकसंख्येच्या बाबतीत भारताने नुकतेच चीनला मागे टाकले आहे. अशा परिस्थितीत लोकसंख्या आणि झाडं यांचा योग्य रेशो असणे गरजेचे आहे. आज ज्या डॉ. बाबासाहेब यांच्या नावाने पुरस्कार दिला जात आहे, त्यांनी सादर केलेल्या ‘इंडियन रूपीज’ या प्रबंधाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. ज्यावेळी कोणी भारतीय चलनावर फारशी चर्चा करत नव्हतं अशा  वेळी डॉ. बाबासाहेबांनी तो प्रबंध लिहिला. या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारने त्या विषयीची एक चित्रफीत तयार करावी. ज्यामुळे डॉ. बाबांसाहेबांच्या योगदानाची  नोंद जागतिक पातळीवर घेतली जाईल.

यावेळी राजेश पांडे, बाळासाहेब जानराव यांनी मनोगत व्यक्त केले. या पुरस्काराची संकल्पना ज्यांची होती त्या अॅड. मंदार जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले आणि आभार सुनील महाजन यांनी मानले.

Leave A Reply

Translate »