शिरूर मतदार संघ पाच वर्षे वाऱ्यावर सोडला; मग खरा गद्दार कोण? आ. दिलीप मोहिते पाटीलची खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका

राजगुरुनगर : शिरूर लोकसभा मतदार संघात निवडणुकीच्या निमित्ताने आरोप- प्रत्यारोप होत असून आ. दिलीप मोहिते यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केळी आहे. मनसे , शिवसेना, एकत्रीत राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि नंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी असे पाच पक्ष फिरून झाल्यावर केंद्रीय मंत्री अमित शहांचे दार ठोठावणारे तुम्ही आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शपथविधीला हजर राहून आम्हाला मिठ्या मारणारेपण तुम्हीच..! तुम्ही आम्हाला निष्ठा शिकवू नका. ज्या जनतेने जिवाचे रान करून निवडून दिले, त्यांच्याशी प्रतारणा केली. पाच वर्षे मतदारसंघ वाऱ्यावर सोडला; मग खरा गद्दार कोण? हे स्वतःला विचारा, असा थेट सवाल करीत दिलीप मोहिते पाटील यांनी अमोल कोल्हे यांचा थेट नामोल्लेख टाळून टीका केली.

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील मंगळवारी (दि. १६) आयोजित केलेल्या प्रचार दौऱ्यादरम्यान ही टीका त्यांनी केली. यावेळी आमदार मोहिते पाटील म्हणाले की, यांच्यासाठी आणखी काय करायला हवे होते? अत्यंत कृतघ्न माणूस आहे. कोरोनाच्या काळात माझा मोठा भाऊ गेला. शूटिंग असल्याचे सांगून येण्याचे टाळले. माझी ही अवस्था तर सर्व सामान्यांच्या सुख-दुःखात हा माणूस कसा येणार?

बैलगाडा शर्यती सुरू केल्याचे खासदार डॉ. कोल्हे प्रचारात सांगत आहेत. हा धागा पकडून मोहिते यांनी कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकवेळ झाली. पिक्चरमधल्या ट्रेंड घोडीवर बसून घाटात नाटक केले. आमच्या घोडीवर बस; मग कळेल कसा टांगा पलटी होतो ते? असे म्हणत आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची खिल्ली उडवली.

जिवाचे रान करून निवडून आणले. पण, खासदार डॉ. कोल्हे यांनी पाच वर्षांत साधा चहासुध्दा पाजला नाही, अशी टीका मोहिते पाटील यांनी केली. त्यावर दुधाच्या दरवाढीवर त्यांनी बोलायला हवे होते, असे कोल्हे म्हणाले होते. त्याला अनुसरून चहा पाजायचा आणि दूध दरवाढीचा संबंध कुठे येतो? आणि येत असल्यास तुम्ही दूध दरवाढीसाठी संसदेत काय दिवे लावले? चार वर्षे कांद्याचे भाव दिसले नाहीत. निवडणूक आली म्हणून दिसले, असा टोला आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना लगावला.

Leave A Reply

Translate »