तब्बल १०० रंगावली कलाकार रांगोळीतून साकारणार श्री तिरुपती बालाजी चरित्र कथा

श्रीरंग कलादर्पण फाऊंडेशनतर्फे भव्य रंगावली प्रदर्शन : दिनांक २६ ते २९ जानेवारी

पुणे : श्रीरंग कलादर्पण फाऊंडेशनच्यावतीने श्री तिरुपती बालाजींच्या चरित्रावर आधारित रंगावली प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात तब्बल १०० रंगावली कलाकार रांगोळीतून श्री तिरुपती बालाजी चरित्र कथा साकारणार आहेत. अतिशय कलात्मक, कल्पक आणि सुंदर रांगोळ्या प्रदर्शनात पहाता येणार आहेत. दिनांक २६ ते २९ जानेवारी दरम्यान बालगंधर्व कलादालन येथे श्री तिरुपती बालाजी चरित्र या रंगावली प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्रीरंग कलादर्पण फाऊंडेशनचे संस्थापक प्रा. अक्षय शहापूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.पत्रकार परिषदेला अजित पवार, अश्विनी ववले, सचिन मरशेट्टी आदी उपस्थित होते. प्रा. अक्षय शहापूरकर आणि त्यांच्या १०० विद्यार्थ्यांनी सलग ४८ तास काम करत साकारलेल्या या प्रदर्शनात रांगोळीतील अनेक संशोधने आपल्याला पाहायला मिळतील. हलती रांगोळी, ३ डी गॉगल घालून पहायची रांगोळी, २ इन १ रांगोळी, पाण्यावरची, पाण्याखालची आणि पाण्याच्या मधोमध असलेली रांगोळी, कायमस्वरूपी रांगोळी यात समाविष्ट आहेत.प्रदर्शनाचे उदघाटन दिनांक २६ जानेवारी रोजी सकाळी ९. ३० वाजता माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ज्येष्ठ रांगोळीकार जगदीश चव्हाण, अभिनेता हार्दिक जोशी, अक्षया जोशी आदी उपस्थित राहणार आहेत. दिनांक २९ जानेवारी करवीर पिठाचे आद्य शंकराचार्य यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचा समारोप होईल.दिनांक २६ जानेवारी ते २९ जानेवारी २०२३ या कालावधीत सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत हे प्रदर्शन सर्वांना पाहण्यासाठी विनामूल्य खुले असेल. प्रदर्शनात सिंधुदुर्गातील रांगोळी कलावंत समीर चांदरकर यांचा श्रीरंग कलागौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. प्रतीक अथने, अजित पवार, सचिन मरशेट्टी, अश्विनी ववले यांनी या प्रदर्शनाचे संयोजन केले आहे.प्रा. अक्षय शहापूरकर म्हणाले, श्री तिरुपती बालाजी भूतलावर कोणत्या कारणासाठी आले होते? महालक्ष्मी मातेचा विरह का सहन करावा लागला? महालक्ष्मी माता वैकुंठ सोडून गेल्यावर पुढे काय घडले ? पद्मावती माता नेमकी कोण होती? तिरुपती ला सोने, धन आणि केस का दान केले जातात? पद्मावती मातेशी विवाह का झाला ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या रंगावली प्रदर्शनातून उपस्थितांना मिळतील.

Leave A Reply

Translate »