ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने युवा साहित्यिक अमर दांगट यांचा सत्कार 

पुणे : राज्यभर फिरून ऐतहासिक दस्तऐवजांच्या आधारे शिवचरित्र लिहीत असलेले युवा साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अमर युवराज दांगट यांचा नुकताच ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष समीर देसाई, राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, संपर्क प्रमुख सागर बोदगिरे, धनराज गरड आदी उपस्थित होते.

यावेळी संजय भोकरे म्हणाले, एक युवा साहित्यिक विस्तृत स्वरूपातील शिवचरित्र लिहीत आहे, हे कौतुक करण्यासारखे असून अभिमानास्पद आहे. पुढील काळात त्यांना जी मदत लागेल ती पत्रकार संघ करायला तयार आहे.

दांगट म्हणाले, या सन्मानामुळे माझी जबाबदारी वाढली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य हे आजच्या युवा पिढी पर्यंत पोहचवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.

अमर दांगट यांचे सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडावर संशोधन सुरू असून त्याचे 5 खंड येणार आहेत. त्यापैकी ‘रणधुरंधर शहाजीराजे भोसले आणि स्वराज्याची पायाभरणी’ या शीर्षकाखाली 2 खंड लवकरच प्रकाशित होणार आहेत. यासाठीचे ऐतिहासिक संशोधन त्यांचे मागील दहा वर्षांपासून सुरू असून त्यातून त्यांनी हजारो कागदपत्रांचा संग्रह संपूर्ण महाराष्ट्रात गावोगावी फिरून जमावाला आहे. दांगट यांच्या याच सामाजिक आणि साहित्यिक कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

Leave A Reply

Translate »