चंद्रकांत दळवी, डॉ. शहा यांना ‘राष्ट्रीय बंधुता पुरस्कार’

चोविसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनात १२ जानेवारीला डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार सन्मान

पुणे : माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी आणि चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टीट्यूटचे संस्थापक संचालक ज्येष्ठ व्यवस्थापनतज्ञ डॉ. दीपक शहा यांना यावर्षीचा ‘राष्ट्रीय बंधुता पुरस्कार’ जाहीर झाला आहे. सत्यशोधकी पगडी, प्रबोधनाची लेखणी, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि पाच हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या १२ जानेवारी रोजी होणाऱ्या २४ व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली.

नवी पेठ येथील एस. एम. जोशी सभागृहात राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय या संस्थाच्या वतीने २४ वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन होत आहे. ज्येष्ठ साहित्यिक शंकर आथरे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी १० वाजता प्रसिद्ध साहित्यिक सायमन मार्टीन यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. दुपारच्या सत्रात महाराष्ट्रातील नामवंत कवी ‘काव्यपंढरी’ कवीसंमेलनात सहभागी होतील. यावेळी गुलाबराजा फुलमाळी (नेवासा) यांना लोककवी वामनदादा कर्डक, किशोर बुजाडे (खामगाव) यांना लोकगायक प्रल्हाद शिंदे आणि अमोल घाटविसावे (अहमदनगर) यांना पद्मश्री नामदेव ढसाळ काव्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.

स्वागताध्यक्ष डॉ. विजय ताम्हाणे, प्रा. चंद्रकांत वानखेडे, डॉ. अरुण आंधळे, ज्येष्ठ गझलकार सिराज शिकलगार, मधुश्री ओव्हाळ, डॉ. अशोककुमार पगारिया, प्रकाश जवळकर यांचा संमेलनात मुख्य सहभाग राहील. कोरोनासंबंधीचे सर्व नियम पाळून हे संमेलन होईल, असे मुख्य संयोजक प्रा. डॉ. प्रभंजन चव्हाण आणि प्रा. प्रशांत रोकडे यांनी सांगितले.

Leave A Reply

Translate »