‘देशोदेशी पानोपानी – लता लता’ प्रदर्शन व विशेषांक पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या हस्ते उद्घाटन

माझे बाबा गेले तेंव्हा मी लहान असल्यामुळे काहीच कळत नव्हते. मी साठ वयाचा आसपास असताना आईचे निधन झाले. तेंव्हा दुःख झाले. लता दीदी गेल्यामुळे मात्र धक्का बसला. ती केवळ मोठी बहिण नव्हे तर, माऊली होती. अशा भावना भावगंधर्व पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी आज व्यक्त केल्या. लता दीदींच्या निधनानंतर देश आणि विदेशातील माध्यमांनी प्रकाशित केलेल्या वृत्तान्तांचे ‘देशोदेशी पानोपानी – लता लता’ या प्रदर्शनाचे उद्घाटन बालगंधर्व कलादालन येथे त्यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार होते. या प्रसंगी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर गाडगीळ, या संकल्पनेचे जनक व संकलक स्वरप्रतिभाचे संपादक प्रवीण प्र. वाळिंबे, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन उपस्थित होते. याप्रसंगी पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते स्वरप्रतिभा, देशोदेशी पानोपानी – लता लता, हा विशेषांक  प्रकाशित करण्यात आला. कार्यक्रमाचे निवेदन गौरी दामले यांनी केले.

    यावेळी लता दीदींच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यांना एक मिनट उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला तन्मयी नचिकेत मेहेंदळे यांनी गगन सदन हे सरस्वती स्तवन सादर केले. प्रास्ताविक स्वरप्रतिभाचे संपादक प्रवीण प्र वाळिंबे यांनी केले. ते म्हणाले की, देशातील २३ राज्यतील १५० वृत्तपत्रे, ३० देशातील ६५ वृतांचा या प्रदर्शनात व स्वरप्रतीभा विशेषांकात समावेश आहे. साऱ्या जगाने लतादीदींच्या निधनाची कशी दखल घेतली याची माहिती यातून होते.

   पं. हृदयनाथ मंगेशकर याप्रसंगी म्हणाले की, लतादीदींचा आवाज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. त्यांच्या निधनानंतर ४० हून अधिक देशांमध्ये राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणले गेले. पाकिस्तान सारख्या देशातही दुखवटा पाळला गेला.

  इतकी महान व्यक्ती असूनही लता दीदींचे वागणे अत्यंत साधे होते. घरी आलेले फोन त्या सहजतेने घेत. त्यांच्या निधनाने कधी भरून न येणारी पोकळी निर्माण झाली.असे ते म्हणाले. याप्रसंगी उल्हास पवार म्हणाले की, अ.भा. मराठी साहित्य संमेलनात लतादीदी उद्घाटक होत्या. त्यांनी छापील भाषण वाचायला सुरुवात केली. पण ते बाजूला ठेऊन उत्स्फुर्त भाषण केले त्यांच्या रूपाने जणू सरस्वतीचेच दर्शन होत राहिले.

  लतादीदींच्या आठवणी जागवताना सुधीर गाडगीळ म्हणाले की, लता दीदींच्या मुलाखती घेताना त्यांच्या बोलण्या व वागण्यातील सहजता प्रमुख पणे जाण्याची. लता मंगेशकर पुन्हा होणे नाही, असे सांगून त्यांनी लता दीदींच्या विविध स्मृतींना उजाळा दिला.

  या प्रसंगी कृष्णकुमार गोयल यांनी लता मंगेशकर या जगातील अनमोल ठेवा असून सुमारे २२ वर्षांपूर्वी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे सुरु केलेला, पहिला अशा भोसले पुरस्कार ८ सप्टेंबर. या आशाताईंच्या वाढदिवसाच्या दिवशी लतादीदींनी स्वीकारला यातच त्यांचे मोठेपण दिसून येते.

    यानंतर देविका दामले हिने ‘रहेना रहे हम‘ हे लता दीदींचे लोकप्रिय गीत सादर केले.संवाद पुणेचे सुनील महाजन यांनी आभारप्रदर्शन केले. यात लवकरच बारामती येथे प्रदर्शन भरवणार असल्याची चर्चा चालू असून कोल्हापूर मुंबई इंदोर आदि ठिकाणाहून हे प्रदर्शन तेथे भारावले जाण्याबद्दल विचारणा झाल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी यु.जी.सी ग्रुपचे चेअरमन सुहास ढोले, नंदन देऊळकर, विनीत पारनाईक यांचा विशेष सहयोगाबद्दल पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या हस्ते श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रदर्शन व विशेषांक तयार करणाऱ्या टीम स्वरप्रतिभाच्या श्रुती तिवारी, तन्मयी नचिकेत मेहेंदळे, अर्चना कुंभार, सागर बाबर, शिल्पा अंतापुरकर, अलका पाटील यांचा स्मृतीचिन्ह देऊन पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

Leave A Reply

Translate »