तिसरे रोटरी मराठी साहित्य संमेलन ४, ५ आणि ६ डिसेंबरला पुण्यात
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे उद्घाटक : संमेलनाध्यक्ष डॉ. शरणकुमार लिंबाळे : स्वागताध्यक्ष श्यामकांत कोतकर
पुणे : वाचन संस्कृतीची निकोप वाढ व्हावी, रोटेरियन्समध्ये साहित्य अभिरूची वृद्धींगत व्हावी आणि साहित्य रसिकांना दर्जेदार साहित्यविषयक उपक्रमांमधून निखळ आनंद मिळावा या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजतर्फे दि. ४ डिसेंबर ते दि. ६ डिसेंबर २०२६ या कालावधीत तिसऱ्या रोटरी मराठी साहित्य संमेलनाचे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन होत असून स्वागताध्यक्ष नंदन बिल्डकॉनचे अध्यक्ष श्यामकांत कोतकर आहेत. ज्येष्ठ रंगकर्मी, लेखक पद्मश्री सतीश आळेकर यांना रोटरी व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे.
रोटेरियन्स आणि साहित्यप्रेमींना ग्रंथदिंडी, उद्घाटन समारंभ, परिसंवाद, मुलाखत, काव्य संमेलन आणि सांगीतिक उपक्रमांची पर्वणी अनुभवायास मिळणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संगीत नाटक सादर करण्याची परंपरा होती. पण ती काही वर्षांपासून खंडित झालेली ही परंपरा रोटरी साहित्य संमेलनात पहिल्या वर्षीपासून सुरू करण्यात आली असून यंदाही संगीत नाटकाची मेजवानी रसिकांना मिळणार आहे, अशी माहिती प्रांतपाल नितीन ढमाले, रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजचे अध्यक्ष केदार गोडबोले, संमेलनाच्या कार्याध्यक्ष मधुमिता बर्वे, सहकार्याध्यक्ष मोहन चौबळ, मार्गदर्शक राजीव बर्वे, नंदन बिल्डकॉनचे रोहन कोतकर यांनी आज (दि. १८) पत्रकार परिषदेत दिली. रोटरीच्या २० क्लबचा संयोजनात सहभाग असणार आहे.
शुक्रवार, दि. ४ रोजी दुपारी ४:३० वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. सायंकाळी ५:३० वाजता उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला असून संमेलनाचे उद्घाटन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, नगरसेविका ॲड. मीताली सावळेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. रात्री ८:३० भरत नाट्य संशोधन मंदिराची निर्मिती असलेल्या ‘संगीत मत्स्यगंधा’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.
शनिवार, दि. ५ डिसेंबर रोजी सकाळी ९:५० वाजता रेणुका केळकर-टिकरे आणि सहकारी शिववंदना सादर करणार आहेत. सकाळी १० वाजता पद्मश्री भावगंधर्व हृदयनाथ मंगेशकर यांची विशेष मुलाखत होणार असून त्यांच्याशी विजयालक्ष्मी मणेरीकर संवाद साधणार आहेत. ‘वाचन संस्कृती बरोबर लेखन संस्कृतीही कमी होत आहे का?’ या विषयावर दुपारी १२ वाजता परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यात प्रणव सखदेव, आश्लेषा महाजन, सौरभ वागळे, शेफाली वैद्य यांचा सहभाग असणार आहे. डॉ. आशुतोष जावडेकर अध्यक्षस्थानी असतील. दुपारी २:३० वाजता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांचा विशेष सत्कार होणार असून त्यानंतर अंजली कुलकर्णी त्यांची मुलाखत घेणार आहेत. सायंकाळी ४:३० वाजता कवी सौमित्र अर्थात किशोर कदम यांच्या अध्यक्षतेखाली रोटरी परिवारातील १५ उत्कृष्ट कवींचे संमेलन होणार आहे. रात्री ८:१५ वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘जयोस्तुते’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम सुप्रसिद्ध अभिनेते आणि वक्ते योगेश सोमण सादर करणार आहेत.
रविवार, दि. ६ डिसेंबर रोजी सकाळी ९:५० वाजता अमेया पळणीटकर आणि सहकारी सरस्वती वंदना सादर करणार आहेत. सकाळी १० वाजता पद्मश्री सतीश आळेकर यांना रोटरी व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्डने गौरविले जाणार असून त्यांची मुलाखत डॉ. मंदार परांजपे घेणार आहेत. सकाळी ११:३० वाजता ‘अभिजात दर्जा मिळाला पुढे काय?’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यात डॉ. संदीप सांगळे, डॉ. केशव देशमुख, डॉ. नीलिमा गुंडी, डॉ. स्वाती महाळंक यांचा सहभाग असून प्रा. मिलिंद जोशी अध्यक्षस्थानी असणार आहेत. दुपारी २ वाजता प्रा. अप्पासाहेब खोत व बाबा परीट यांचे कथाकथन होणार आहे. दुपारी ३:३० वाजता ज्येष्ठ वक्ते उल्हास पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘आजच्या काळात संतसाहित्याची आवश्यकता आहे का?’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यात भावार्थ देखणे, अभय टिळक, योगिराज पैठणकर, मनिषा बाठे यांचा सहभाग आहे. सायंकाळी ५ वाजता सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांची विशेष मुलाखत आयोजित करण्यात आली असून त्यांच्याशी प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर संवाद साधणार आहेत. साहित्य संमेलनाचा समारोप सायंकाळी ६:३० केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.

Comments are closed.