महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी करणार दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण!
पुणे: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी आता आपल्या कारकिर्दीतील नव्या पर्वाला सुरुवात करत आहे. अभिनय, सूत्रसंचालन, नृत्य, चित्रपट निर्माती आणि उद्योजिका अशा विविध क्षेत्रांत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली प्राजक्ता आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.
मराठी मालिकांपासून चित्रपटांपर्यंत अनेक संस्मरणीय भूमिका साकारत प्राजक्ताने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिच्या सहजसुंदर अभिनयशैलीमुळे आणि विविधांगी व्यक्तिमत्त्वामुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. आता ती दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप उमटवण्यासाठी सज्ज असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्राजक्ताच्या आगामी तेलुगू चित्रपटाचं चित्रीकरण सध्या सुरू आहे व तो ह्याच वर्षी प्रदर्शित होईल. या चित्रपटाची कथा, कलाकारांची फळी आणि प्राजक्ताची भूमिका याविषयीची अधिक माहिती लवकरच आपल्यासमोर येईल, असं प्राजक्ता म्हणाली. त्यामुळे या प्रोजेक्टबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
प्राजक्ता या चित्रपटात नेमक्या कोणत्या भूमिकेत दिसणार, तिचा लूक कसा असेल आणि ती कोणत्या कलाकारांसोबत झळकणार, याबाबत चाहत्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आलं आहे. मराठी मनोरंजन विश्वात यशस्वी वाटचाल केल्यानंतर आता तेलुगू चित्रपटसृष्टीतील तिच्या नव्या प्रवासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.