पुणे : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेला माजी उपमहापौरांचा स्नेहमेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शहराच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा मेळावा संस्मरणीय ठरला.
या कार्यक्रमाला माजी उपमहापौर डॉ. सतीश देसाई, आबा बागुल, बंडू गायकवाड, दीपक मानकर, प्रकाश मंत्री, प्रसन्न जगताप, सुनीता वाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विरोधी पक्षनेते नीलेश निकम, माजी नगरसेवक दत्ता सागरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) शहराध्यक्ष संजय सोनवणे, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्यासह अनेक मान्यवर आणि पत्रकारांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली.
स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने सर्व माजी उपमहापौरांना एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी मिळाली. राजकारणातील अनुभव, शहराच्या विकासासाठी केलेले प्रयत्न आणि भविष्यातील दृष्टीकोन यावर अनौपचारिक चर्चा रंगली. वातावरण मैत्रीपूर्ण आणि आनंददायी होते.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे माजी उपमहापौरांनी सादर केलेली गीते. परशुराम वाडेकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी विविध मराठी व हिंदी गीते सादर करत आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले. या संगीत मैफलीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले आणि कार्यक्रमाला वेगळेच रंगतदार स्वरूप प्राप्त झाले.
संपूर्ण कार्यक्रमात एकोप्याचा, स्नेहाचा आणि सहकार्याचा संदेश देण्यात आला. अशा प्रकारचे स्नेहमेळावे भविष्यातही आयोजित करण्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

Comments are closed.