शिवसेना उबाठाचा किल्ला ढासळला, प्रभाग ९ व ११ मध्ये भाजपचा झेंडा रोवला

पुणे :- पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला जोरदार धक्का बसला असून, प्रभाग क्रमांक ९ आणि ११ मधील उबाठा गटाचे अधिकृत व बंडखोर उमेदवार शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झाले आहेत. या सर्वांनी भाजपच्या अधिकृत उमेदवारांना जाहीर पाठिंबा देत भाजपची ताकद अधिक मजबूत केली आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुड येथील निवासस्थानी हा महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. ना. पाटील यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे भाजपमध्ये जाहीर स्वागत करत अभिनंदन केले व पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रभाग ९ आणि ११ मध्ये उबाठा गटाची मोठी पीछेहाट, कोथरुड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ (क) आणि (ड) तसेच प्रभाग क्रमांक ११ (अ) मध्ये शिवसेना उबाठा गटाची संघटनात्मक घडी विस्कटल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रभाग क्रमांक ९ मधील उबाठा गटाचे बंडखोर उमेदवार महेश सुतार (ड), पूजा सुतार (क), नियोजन समितीचे सदस्य सुखदेव तापकीर, तसेच प्रभाग क्रमांक ११ (अ) मधील अधिकृत उमेदवार बाळासाहेब धनवडे, विद्यार्थी सेनेचे अमर गायकवाड आणि माजी नगरसेवक पैलवान दिलीपदादा गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.

 

या सामूहिक पक्षप्रवेशामुळे उबाठा गटाला प्रभाग पातळीवर जबरदस्त फटका बसला असून, भाजपची संघटनात्मक व निवडणुकीतील आघाडी अधिक भक्कम झाली आहे.

 

यावेळी बोलताना ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “भारतीय जनता पक्षासाठी हे सर्व पक्षप्रवेश अत्यंत आनंददायी आहेत. यापूर्वीच भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आता प्रभाग क्रमांक ९ आणि ११ मधील उमेदवारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाची ताकद दुपटीने वाढली आहे. पुणे महापालिका निवडणुकीत भाजपच्या विजयाची ही ठाम नांदी आहे.”

 

भाजप नेतृत्वाची भक्कम उपस्थिती

या पक्षप्रवेश सोहळ्याला प्रभाग क्रमांक ९ मधील भाजप उमेदवार लहू बालवडकर, गणेश कळमकर, रोहिणी चिमटे, तसेच प्रभाग क्रमांक ११ मधील भाजप उमेदवार अजय मारणे, अभिजीत राऊत उपस्थित होते.

यासोबतच भाजपचे नेते डॉ. संदीप बुटाला, प्रकाशतात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, शिवम बालवडकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

दरम्यान, एकीकडे विरोधकांची गळती, अंतर्गत गोंधळ आणि नेतृत्वावरचा विश्वास उडालेला असताना; दुसरीकडे भाजपकडे वाढणारा विश्वास, संघटनबळ आणि आक्रमक राजकीय वाटचाल – या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका निवडणुकीत भाजप स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित करत असल्याचे चित्र आता ठळकपणे समोर येत आहे.

Comments are closed.

Translate »