उमेदवारी मागे घेतली अन् निष्ठावंत शिवसैनिकाचा भाजपमध्ये प्रवेश, प्रभाग २४ मध्ये बिडकरांना वाढता पाठिंबा

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, रास्ता पेठेतील शिवसेनेचे ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते उमेश कृष्णा शेडगे यांनी आज अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे आणि माजी सभागृह नेते गणेश बिडकर उपस्थित होते.

शेडगे यांनी प्रभाग २४ मधून भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या २० वर्षांपासून मराठा मित्र मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे उमेश शेडगे यांची मनसे व शिवसेनेत एकनिष्ठपणे कार्य केलेले होते. या भागामध्ये त्यांचा जनसंपर्क देखील मोठा आहे.

 

“राष्ट्र प्रथम हे ध्येय घेऊन शहर व देशाच्या विकासासाठी भाजप सातत्याने काम करत असून, प्रभागात माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी राबवलेली विकासकामे आणि रोजगारनिर्मितीची दिशा प्रेरणादायी आहे. ही विकासाची गती कायम ठेवण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला,” अशी भावना उमेश शेडगे यांनी व्यक्त केली.

 

या प्रवेशामुळे प्रभाग २४ मध्ये गणेश बिडकर यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट होत असून, आगामी निवडणुकीत भाजपची ताकद अधिक मजबूत होताना दिसत आहे.

 

 

Comments are closed.

Translate »