शिरूर  मतदार संघात आम्ही काहीही कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

शिरूर : राज्यात चौथ्या टप्यात मतदान होत असलेल्या लोकसभा मतदारसंघात जोरदार प्रचाराने राजकीय वातावरण तापल्याचे दिसते. खासदारकीचा राजीनामा द्यायला निघालेल्या डॉ. अमोल कोल्हेंना मीच थांबविले आणि पाच वर्षे काम करा म्हटले. आणि आता हाच बाबा खासदारकीची मते मागत फिरतोय. याला नाटकाच्या कामातून वेळ मिळेना आणि आता नुसते डायलॉग बोलत शिरुरच्या मतदारांना भुलवतोय अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार कोल्हेंवर केली.

शिरूर लोकसभा मतदार संघातील  टाकळी हाजी येथे महायुतीचे उमेदवार   शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अजित पवार बोलत होते.  माजी आमदार पोपटराव गावडे  यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, भाजपच्या नेत्या जयश्री पलांडे, माजी सभापती सुनीता गावडे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, आम्ही राज्याचे राजकारण करता करता वयाच्या ६० वर्षाच्या जवळपास पोहचलो आहे. मात्र आता जेष्ठानी आम्हावर जबाबदारी टाकून मार्गदर्शन करायला हवे. अशी राष्ट्रवादीतील तब्बल ८० टक्के नेते पदाधिकाऱ्यांची इच्छा होती. मात्र जेष्ठ नेते शरद पवार हे असा कुठलाच निर्णय घ्यायला तयार नव्हते. पर्यायाने आम्ही धाडसाने हा निर्णय घेतला. आता विकासाच्या उच्च गतीने पुढे नेण्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे. शिरूर  मतदार संघात आम्ही काहीही कमी पडू देणार नाही ही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री  पवार यांनी दिली.

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्य सरकार ओबीसीच्या प्रश्नासाठी जागृत असुन, त्यांनी सर्व समाज घटकांना सामाजिक न्याय देण्याचे काम केले आहे. विकासासाठी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करा. 

आढळराव पाटील म्हणाले की, मी पाच वर्षापूर्वी पराभूत झालो तरी सुद्धा जनतेची नाळ तुटू दिली नाही. मात्र विद्यमान खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी जनतेचा भ्रमनिरास केला.

माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले की, या भागातील विविध प्रश्नासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून मी उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना साथ देण्याचा निर्णय घेतला असुन त्यामुळे कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध झाला आहे.

Leave A Reply

Translate »