अमोल कोल्हे एकदा निवडून गेल्यानंतर पुन्हा मतदारसंघात फिरकलेच नसल्यामुळे नागरिक नाराज आहेत – आढळराव पाटील

Shivajirao Adhalrao Patil Targets Amol Kolhe: शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. कारण बारामतीप्रमाणे शिरूरमध्येही ‘पवार विरुद्ध पवार’ अशी लढत पाहायला मिळणार आहे. शिरूर येथून महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शिवाजीराव अढळराव पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अमोल कोल्हे मैदानात असतील.

मात्र शिरूरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे एकदा निवडून गेल्यानंतर पुन्हा मतदारसंघात फिरकलेच नसल्यामुळे नागरिक नाराज आहेत. याचमुळे अमोल कोल्हे भावनिक राजकारण करत असल्याचे चित्र आहे. यावर कोल्हेंचे विरोधी उमेदवार आढळराव पाटलांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

अलीकडेच माध्यमांशी संवाद साधताना आढळराव पाटलांना अमोल कोल्हेंना भावनिक राजकारण का करावं लागतंय? असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देताना आढळराव पाटील म्हणाले की, “कोल्हेंनी विकासकामं केली नाहीत. त्यांना विजयाची खात्री नाही. यापूर्वी कोल्हे जेव्हा उमेदवार म्हणून शिरूरमध्ये यायचे, तेव्हा लोक सन्मामाने डोक्यावर पदर घेऊन रांगा लावायचे. कारण संभाजी महाराज म्हणून लोकांमध्ये त्यांची प्रतिमा होती. मात्र आता त्यांना घरोघरी जाऊन ४-५ लोकांसमोर भाषण द्यावे लागत आहे. काल मी पाहिलं, आमचा ग्रामीण दौरा होता. एका घरामध्ये हॉलमध्ये फक्त ७-८ लोक होते, त्यांच्यापुढे त्यांनी अर्धा तास भाषण दिलं. अशी परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांना भावनिक राजकारण करणं साहजिक आहे”, असेही आढळराव पाटलांनी म्हटलं.

Leave A Reply

Translate »