मुरलीधर मोहोळांच्या पाठिशी आता संजय काकडेंचे बळ; मोहोळांची ताकद वाढली !

पुणे: महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे चित्र आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले असून युती आणि आघाडीचे उमेदवार जवळपास निश्चित झाल्याच दिसत आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपने मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने युवा नेतृत्वाला संधी दिली असून कॉंग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर हे उमेदवार आहेत. धंगेकर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर कॉंग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरु असल्याने राज्यस्तरावरील नेत्यांच्या बैठकीकडेही पदाधिकारी पाठ फिरवत आहेत. याच्या उलट चित्र भाजपमध्ये पाहायला मिळत असून पक्ष नेतृत्वाने नाराजी दूर केल्यानंतर इच्छुक राहिलेले नेते अंगझटकून कामाला लागले आहेत.

भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी पक्षीय नेत्यांसह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना भेटण्याचा सपाटा लावला आहे. भाजपचे माजी राज्यसभा खासदार आणि शहरामध्ये तगडे ‘नेटवर्क’ असणारे संजय काकडे यांची मोहोळ यांनी भेट घेतली. यामुळे काकडेंचे बळ देखील आता पाठीशी राहणार असल्याने मोहोळांची ताकद वाढणार आहे. संजय काकडे हे स्वतः लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते, परंतु पक्ष घेईल तो निर्णय मान्य असून ज्याला उमेदवारी मिळेल त्यांचे काम पूर्ण ताकदीने करणार असल्याचं त्यांनी आधीच स्पष्ट केलं होत.

वडगाव शेरीत जगदीश मुळीकांच्या मॅरेथॉन बैठका
पुणे लोकसभेसाठी आणखीन एक इच्छुक राहिलेले माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी दूर केली. यानंतर आता मुळीक हे देखील मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचार यंत्रणेत सक्रीय झाले आहेत. महिला आघाडीच्या बैठकीनंतर मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेत जास्तीत जास्त मताधिक्य मिळवण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.

Leave A Reply

Translate »