भागीरथी missing’ चित्रपटाच्या पोस्टर आणि म्युझिक चे दिमाखादार सोहळ्यात लॉंचिंग 

पुणे: मराठी चित्रपटामध्ये सातत्याने वेगळे आणि वास्तववादी विषय हाताळले जातात. दिग्दर्शक सचिन वाघ यांनीही एक अत्यंत हटके विषय  ‘भागीरथी missing’  या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. सस्पेन्स, थ्रीलर असलेल्या या  चित्रपटाच्या पोस्टर आणि म्युझिक चे लॉंचिंग नुकतेच पुण्यातील बाळासाहेब ठाकरे कला दालनात मोठ्या दिमाखदार सोहळ्यात करण्यात आले. 

‘सह्याद्री मोशन पिक्चर्स’ निर्मित आणि सचिन वाघ दिग्दर्शित   ‘भागीरथी missing’  या चित्रपटाच्या अतिशय रंगतदार झालेला हा सोहळा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले,स्मार्तना पाटील (आयपीएस, पोलीस उपायुक्त,झोन 2, पुणे), सुषमा चव्हाण (सेवा निवृत्त,सहाय्यक पोलीस आयुक्त) या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक सचिन वाघ,कार्यकारी निर्माते योगेश जोशी,अभिनेत्री शिल्पा ठाकरे, अभिषेक अवचट, लेखक संजय इंगुळकर,संगीतकार आशुतोष कुलकर्णी यांच्यासह चित्रपटातील सर्व कलाकार, तंत्रज्ञ या ठिकाणी उपस्थित होते. 

‘भागीरथी missing’ बद्दल बोलताना निर्माता – दिग्दर्शक सचिन वाघ म्हणाले, आमचा चित्रपट या अत्यंत संवेदनशील विषयावर भाष्य करतो. कोल्हापूर जिल्ह्यातील एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. हा विषय संवेदनशील असला तरी श्रवणीय संगीत, उत्कंठावर्धक कथानक व वेगळ्या धाटणीची मांडणी याद्वारे त्यामध्ये सर्वसामान्य प्रेक्षकाला हवहवेसे वाटणारे मनोरंजन देखील असेल यांची काळजी आम्ही घेतली आहे. यामुळे ‘भागीरथी missing’ ला सर्व स्तरातील प्रेक्षकांची पसंती मिळेल असा मला विश्वास वाटतो. 

अभिनेत्री शिल्पा ठाकरे म्हणाली “भागीरथी missing’ हा चित्रपट करणे माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. भागीरथी ही व्यक्तिरेखा साकारणे मोठे चॅलेंज होते. तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना अत्यंत सरप्राइजिंग आहेत.तसेच माझे बालपण गावाकडे गेलेले असल्यामुळे गावातील तरुणी साकारणे ही गोष्ट मला पुन्हा त्या वातावरणात घेऊन गेली. दिग्दर्शक सचिन वाघ यांच्या स्पष्ट व्हीजनमुळे भागीरथी पडद्यावर साकारतानाचा माझा अनुभव खूप अविस्मरणीय होता” 

याप्रसंगी बोलताना मेघराज राजेभोसले म्हणाले, हा चित्रपट मी नुकताच पाहिला, दर्जेदार कथानक, श्रवणीय संगीत आणि कलाकारांचा अभिनय उत्तम झाला आहे. अत्यंत संवेदनशील विषय सचिन वाघ यांनी हाताळला आहे. कोणत्याही घरातील एखादी मुलगी किंवा महिला मिसींग होणे ही बाब अत्यंत धक्कादायक असते, या संवेदनशील विषयाला प्रेक्षक साथ देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.
यावेळी बोलताना पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील म्हणाल्या, मुली, महिला बेपत्ता होणे हा अतिशय संवेदनशील विषय आहे. जेंव्हा आमच्याकडे अश्या तक्रारी दाखल होतात त्यावर पोलीस अधिकारी, कर्मचारी गांभीर्याने काम करतात, अशा केसेस खूप आव्हानात्मक असतात, काही केसेस मध्ये वर्षांनुवर्षे लागतात, हा सर्व घटनाक्रम तीन तासांत मांडण्याचे आव्हान सचिन वाघ यांनी लीलया पेलले आहे.

‘भागीरथी missing’ या चित्रपटात शिल्पा ठाकरे, सुरेश विश्वकर्मा, अभिषेक अवचट, चंद्रकांत मूळगुंदकर, संदीप कुलकर्णी आणि पूजा पवार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या  चित्रपटाची कथा – संवाद संजय इंगूळकर यांची आहे.

चित्रपटाला आशुतोष कुलकर्णी यांचे संगीत असून मंदार चोळकर, डॉ. संगीता गोडबोले यांची गीते आहेत. पं. शौनक अभिषेकी यांनी या मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे ही विशेष जमेची बाब आहे. सुवर्णा राठोड, शरयू दाते आणि जयदीप वैद्य यांनी इतर गीते गायली आहेत.

चित्रपटाचे छायांकन दिनेश कंदरकर, ध्वनि संयोजन राशी बुट्टे, कला दिग्दर्शन नितीन बोरकर, रंगभूषा दिनेश नाईक, वेशभूषा शिवानी मगदुम यांनी केले आहे. तर कार्यकारी निर्माते योगेश जोशी आहेत. ‘भागीरथी missing’  लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Leave A Reply

Translate »