“शेवटचा घोट” नाटिका आणि “फुलवूया ही वनराई” नृत्यगीताने जिंकला “वनराई करंडक”

“फुलवूया ही वनराई” या गीत नृत्याने रसिकांची मने जिंकली…

पुणे : नव्या पिढीकडून बळीराजाला जगण्याची नवीन उमेद देत त्याला येणार्‍या संकटावर मात करून आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा संदेश देणार्‍या “शेवटचा घोट” या सौ. सुशीलाबाई वीरकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यानी सादर केलेल्या नाटिकेस वनराई करंडक मिळाला. तर सुरेल गीत गायन, वाद्यांची उत्तम साथसंगत, विद्यार्थ्यांच्या समूहाने सादर केलेल्या “फुलवूया ही वनराई, वनराईची नवलाई” या गीत नृत्याने रसिकांची मने जिंकली. डी.ई.एस.सेकंडरी शाळेने सादर केलेले या पर्यावरण संवर्धन नृत्यगीतास प्रथम परितोषिक मिळाले आहे. कै. अण्णासाहेब बेहेरे सन्मानचिन्ह, रोख रक्कम, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
स्पर्धेची अंतिम फेरी आणि बक्षीस समारंभ नुकताच बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडला. बक्षीस समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे बालकलाकार आर्या घारे, दिग्दर्शक सतीश फुगे, वनराईचे विश्वस्त रोहिदास मोरे, धन्यकुमार चोरडिया, सागर धारिया, सचिव अमित वाडेकर, वनराई पर्यावरण वाहिनी प्रकल्प संचालक भारत साबळे, बॅक टू स्कूल या चित्रपटातील सर्व कलाकार उपस्थितीत होते. कै. इंदिरा बेहेरे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अशोक बेहेरे यांचे या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले.
नाटिका विभागात – प्रथम- सौ. सुशीलाबाई वीरकर हायस्कूल, द्वितीय- चंद्रकांत दरोडे माध्यमिक विद्यालय, तृतीय- न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, उत्तेजनार्थ- चं. बा. तुपे साधना विद्यालय, हडपसर आणि एन. सी. एल. इंग्लिश मेडियम प्रायमरी स्कूल यांना परितोषिक मिळाले.
नृत्य विभागात प्रथम- डी. ई. एस. सेकंडरी स्कूल, द्वितीय- मॉडर्न इंग्लिश मेडियम स्कूल, तृतीय- विद्यापीठ हायस्कूल पुणे, उत्तेजनार्थ- आदर्श विद्यालय नातूबाग शाळा आणि महिलाश्रम हायस्कूल, कर्वे नगर यांना परितोषिक मिळाले.
स्पर्धेचे परीक्षण ज्योती रावेरकर, जतीन पांडे, किरण तिवारी यांनी केले.
वनराई संस्थेच्या वतीने पुण्यातील शाळांसाठी वनराई पर्यावरण वाहिनी अंतर्गत वनराई करंडक दरवर्षी आयोजीत केला जातो. यंदा हे स्पर्धेचे २० वे वर्ष आहे. सिंहगड रोड येथील सानेगुरुजी स्मारक स्व. निळू फुले सभागृह येथे करंडकाची प्राथमिक फेरी झाली होती. यावेळी ३० शाळांनी सहभाग घेतला होता. पर्यावरण जनजागृती संबंधी नाटिका, गायन-नृत्य सादरीकरण हा “वनराई करंडकाचा” मुळ उद्देश आहे.  नाटिका, गीत, पर्यावरण संदेश, समूह नृत्याविष्कार, काव्य व संगीत या निकषांच्या आधारे स्पर्धेचे मुल्यांकन होते. विद्यार्थ्यांवर पर्यावरण संरक्षणाचे संस्कार घडावे, पर्यावरणाविषयी त्यांच्यात प्रेम निर्माण व्हावे यासाठी हा करंडक दरवर्षी पुण्यामध्ये आयोजित केला जातो.

Leave A Reply

Translate »