लोकांमध्ये आरोग्याबद्दल जागृती निर्माण हे नवीन युगातील डॉक्टरांचे काम – डॉ. भूषण पटवर्धन

डॉ. आनंद मोरे लिखित “आरोग्याचे संविधान ग्रंथ प्रकाशन” समारंभ संपन्न

पुणे –  पाश्‍चात्य देशामध्ये स्वास्थ आणि वैद्यकीय ही समान अर्थाने वापरली जातेय; मात्र ते योग्य नाही. औषध घेतल्यानंतर आरोग्य मिळेल, हा विचार घुसवला आहे. मात्र आरोग्य ही बाब पर्यावरण, पोषण, जीवनशैली आणि अनुवंशिकता या चार स्तंभावर आधारलेली आहे. यातील एखादा स्तंभ कमकुवत झाला तर वैद्यकीय सेवेचा त्याला टेकू द्यावा लागतो. हे होऊ नये याचे ज्ञान अ‍ॅलोपॅथिक उपचार पद्धतीतून दिले जात नाही, तर ते  योग आणि आयुर्वेदात दिलेले आहे. डॉक्टर रोगमुक्त करतात ते आरोग्य देवू शकत नाहीत. लोकांना आरोग्याबद्दल जागृती निर्माण करुन त्यांचे स्वास्थ अबाधित ठेवणं हे नवीन युगाच्या डॉक्टरांचे काम आहे. या पार्श्‍वभूमीवर आयुर्वेदाचे संविधान हे पुस्तक खूप महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेचे (नॅक) अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केले.

वनराई प्रकाशित व डॉ. आनंद मोरे लिखित ‘आरोग्याचे संविधान’ या पुस्तकाचे प्रकाशन आयुष मंत्रालयाचे सल्लागार डॉ. मनोज नेसरी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी डॉ. पटवर्धन बोलत होते. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ वसंतराव गाडगीळ, आयुर्वेदाचार्य  डॉ. योगेश बेंडाळे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथीच्या संचालक डॉ. के. सत्यलक्ष्मी, वनराई अध्यक्ष रवींद्र धारिया, विश्वस्त रोहिदास मोरे, सचिव अमित वाडेकर, डॉ. संजय चोरडीया, मकरंद टिल्लू यावेळी उपस्थित होते.

यावेळी रवींद्र धारिया यांनी प्रकाशकीय भूमिका मांडली. डॉ. भेंडोळे, डॉ. के सत्यलक्ष्मी,  डॉ. मोरे यांनीही मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. शैलेश गुजर यांनी केले.

डॉ. मनोज नेसरी म्हणाले की, जलसंधारण, वनसंधारण आणि आरोग्यसंधारण संकल्पनेवर वनराईने काम सुरु केले याचे विशेष कौतुक वाटते. आयुर्वेदाने स्वास्थाची संकल्पना मांडताना संपूर्ण विश्वाचा विचार केला आहे. आपल्या स्वस्थ रहायचे असेल तर संपूर्ण विश्व स्वस्थ राहिले पाहिजे हिच आयुर्वेदाची भूमिका आहे. आयुर्वेदाचे सिद्धांत सोप्प्या भाषेत जनसामान्यांपर्यंत या ग्रंथाद्वारे पोहचले जाणार आहेत. भारतीय वैद्यकशास्त्राला प्राचीन इतिहास आणि दीर्घ परंपरा लाभलेली आहे. वैद्यकशास्त्रामध्ये नैसर्गिक स्रोतांचा सम्यक वापर आणि आरोग्यदायी जीवनशैली यांवर विशेष भर देण्यात आलेला आहे. भारतभूमीमध्ये विकसित झालेल्या आयुर्वेद, योग, प्राणायाम, निसर्गोपचार या उपचारपद्धती आज जगभरात लोकप्रिय होत आहे. स्वास्थ संवर्धनासाठी प्रेरणा मिळण्यासाठी हा ग्रंथ उपयोगी आहे.

डॉ. आनंद मोरे म्हणाले, समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना आरोग्यासंबंधी योग्य सुसंगत शास्त्रीय ज्ञान देण्याबरोबर आरोग्याप्रती त्यांच्यात जागृत करणे, त्यांना स्वतःच्या कृतीने व प्रयत्नाने स्वतःचे, कुटुंबाचे व समाजाचे आरोग्य संपादन करता येण्यासाठी या ग्रंथाची निर्मिती केली आहे. आपले शरीर हे निसर्गाचे एक अविभाज्य अंग आहे हा मूलभूत विचार लोकांमध्ये रुजवण्याबरोबरच त्यांचा दिनक्रम-जीवनशैली सुधारण्यास मदत करणे, एवढेच नव्हे तर अज्ञान, चुकीच्या समजुती, पद्धती, अनिष्ट रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धा यांना आळा घालण्यास मदत करणे यासाठी मार्गदर्शन या ग्रंथात करण्यात आले आहे. आपल्या देशात ज्याप्रमाणे भाषा, प्रांत, जात, धर्म, वर्ण आणि वर्ग निहाय मोठी विभिन्नता आहे. तरीदेखील भारतीय संविधानाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या व नीती-नियमांच्या आधारे देशात सुरळीतपणे लोकशाहीप्रधान राज्यकारभार सुरू आहे. अगदी याचप्रमाणे आपल्या शरीररचनेत विभिन्न प्रकारच्या अवयवांचा समावेश असला तरीसुद्धा ही शरीररचना सुरळीतपणे सुरू रहावी यासाठी आरोग्यविषयक काही मार्गदर्शक तत्त्वांचे आणि नियमांचे पालन करणे गरजेचे असते. याच भूमिकेतून ‘आरोग्याचे संविधान’ हा ग्रंथ लिहिला आहे.

Leave A Reply

Translate »