शिवाजी महाराज, वारकरी संप्रदायाला समर्पित

जागर भक्ती-शक्तीचा’ रंगणार शनिवारी

पुणे : महाराष्ट्राचे आराद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि वैदिक धर्माचे अधिष्ठान असलेल्या वारकरी संप्रदायाचा वारसा जपणाऱ्या ‘जागर भक्ती-शक्तीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवराज्याभिषेक सोहळा आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित हा ‘जागर भक्ती-शक्तीचा’ कार्यक्रम शनिवार, दि. ११ जून २०२२ रोजी सायंकाळी ६.३० वाजता गणेश सभागृह, न्यू इंग्लिश स्कुल, टिळक रोड पुणे येथे होणार आहे.

जागर भक्ती-शक्तीचा एंटरप्राइजेस आणि स्वरप्रभा फाउंडेशन निर्मित, तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग व व्हीनस स्पिरिच्युअल अँड हीलिंग कम्युनिटी ट्रस्ट यांच्या सहयोगाने भक्ती आणि शक्तीला जोडणारा हा कार्यक्रम होत आहे. ‘जागर भक्ती-शक्तीचा’ ध्वनिमुद्रिकेचे (अल्बम) प्रकाशन व प्रत्यक्ष सादरीकरण, तसेच ‘गंध अंतरीचे’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार आहे. हा काव्यसंग्रह भक्ती, शक्ती, भाव आणि प्रेम या चार गंधात रचलेला आहे. अल्बममधील चार गाणी नृत्यावर, तर सहा गाणी गायन स्वरूपात सादर होणार आहेत.

‘जागर भक्ती-शक्तीचा’ हा छत्रपती शिवाजी महाराज आणि संत परंपरेला समर्पित केलेला अल्बम असून, यामध्ये एकूण १८ भजने व गीते आहेत. प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित रघुनंदन पणशीकर, ज्ञानेश्वर मेश्राम, प्रियांका बर्वे, अवधूत गांधी, पराग पांडव यांनी गायन केले आहे. पारंपरिक वाद्यांच्या साहाय्याने पराग पांडव यांनी या अल्बमला संगीत दिले आहे. या सर्व रचना कवी व गीतकार मंगेश निरवणे यांच्या आहेत.

‘जागर भक्ती-शक्तीचा’ प्रकाशन व सादरीकरण कार्यक्रम शनिवारी (दि. ११ जून) होत आहे. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ इतिहास संशोधक पूज्य सद्गुरुदास महाराज (श्री विजयराव देशमुख) यांचे शुभाशीर्वाद लाभले आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवयित्री डॉ. संगीता बर्वे, तर विशेष अतिथी म्हणून टाटा मोटर्स युनियनचे माजी अध्यक्ष प्रभाकर क्षीरसागर, आकोही इंडियाचे चेअरमन डॉ. सानी अवसरमल उपस्थित राहणार आहेत.

‘जागर भक्ती-शक्तीचा’ अल्बमचे निर्माते कवी-गीतकार मंगेश निरवणे, लेखक व इतिहास अभ्यासक संदीप तापकीर, व्हीनस स्पिरिच्युअल अँड हीलिंग ट्रस्टचे शिरीष काकडे, अरुण बाभुळगावकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

Leave A Reply

Translate »