‘मेट्रो मॅन’ डॉ. ई. श्रीधरन यांना “डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार” प्रदान

पुणे: भारताचे ‘मेट्रो मॅन’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. ई. श्रीधरन यांना वनराई फाउंडेशनतर्फे ‘डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार-2021’ने सन्मानित करण्यात आले. डॉ. ई. श्रीधरन यांनी भारतीय रेल्वे आणि मेट्रोच्या माध्यमातून मुलभूत योगदान दिले असून, त्यांच्यामुळे भारतात दळण-वळण सुविधेचे नवे पर्व सुरु झाल्याचे मानले जाते. केरळमधील पोनन्नी येथे हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. एक लक्ष रुपये, शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून, राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या विकासात योगदान देणाऱ्या व आपल्या अलौकीक कार्याचा ठसा उमटवणाऱ्या व्यक्तिमत्वाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

डॉ. ई. श्रीधरन यांना पोन्ननीचे आमदार पी. नंदकुमा यांच्या हस्ते ‘डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कारा’चे सन्मानचिन्ह देण्यात आले, तर वनराई फाऊंडेशन, नागपूरचे कार्याध्यक्ष समीर सराफ, वनराई फाउंडेशन, नागपूरचे सचिव नीलेश खांडेकर, वनराई ट्रस्ट, पुणेचे सचिव अमित वाडेकर यांच्या हस्ते रु. १ लाख धनादेश, शाल, श्रीफळ प्रदान करण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. ई. श्रीधरन यांनी आपल्या भाषणातून कृतज्ञता आणि आनंद व्यक्त केला.

पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड, मृदा-जलसंधारण, एकात्मिक ग्रामीण विकास या क्षेत्रात ‘वनराई’च्या माध्यमातून गेल्या ४0 वर्षांपासून कामे सुरू आहेत. तर सन २०१४ पासून ‘डॉ. मोहन धारिया राष्ट्र निर्माण पुरस्कार’ प्रदान केला जात आहे. 

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, माजी केंद्रीय मंत्री, नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष व ‘वनराई’चे संस्थापक स्व. डॉ. मोहन धारिया यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातही देशहितासाठी भरीव योगदान दिले होते. अनेक रचनात्मक कार्याचा पाया रोवला होता. म्हणूनच दरवर्षी त्यांच्या या प्रेरणादायी जीवनकार्याला समर्पित ‘डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. आजपर्यंत या पुरस्काराने मा. डॉ. रघुनाथ माशेलकर (२०१४), मा. श्री. अण्णा हजारे (२०१५), मा. डॉ. जयंत नारळीकर (२०१६), मा. डॉ. मनमोहन सिंग (२०१७), मा. डॉ. एम. एस स्वामीनाथन (२०१८), मा. डॉ. अनिल काकोडकर (२०१९), मा. डॉ. कस्तुररंगन (२०२०) यांना गौरवण्यात आले असून, यंदाचा २०२१ चा पुरस्कार मा. डॉ. ई. श्रीधरन (२०२१) यांना प्राप्त झाला आहे.

डॉ. ई. श्रीधरन म्हणाले की, आजवर मला १२५ हून जास्त राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. परंतु सर्वात पहिला पुरस्कार महाराष्ट्र शासनाकडून रोख रु. २५,०००/- चा मिळाला होता. आज महाराष्ट्रातील ‘वनराई’ या नामवंत संस्थेकडून रु. १ लाखाचा ‘डॉ. मोहन धारिया राष्ट्र निर्माण पुरस्कार’ स्वीकारताना मला त्या पहिल्या पुरस्काराचे स्मरण होत आहे. पुरस्काराच्या स्वरुपात आजपर्यंत मला जी काही रक्कम मिळाली आहे, ती रक्कम व माझ्या उत्पन्नातील  काही पैसे बाजूला काढून लहान मुलांना भारतीय संस्कृतीविषयी शिकवण देण्यासाठी मी विविध उपक्रम राबवत आहे. यासाठी माझ्या आईच्या नावाने एक स्वयंसेवी संस्था स्थापन केली असून त्या माध्यमातून हे कार्य सुरु आहे. पुरस्कार वितरण समारंभाला त्यांच्या पत्नी राधा ई. श्रीधरन व इतर मान्यवरही उपस्थित होते. वनराई ट्रस्ट, पुणेचे सचिव अमित वाडेकर यांनी यावेळी आभार प्रदर्शन केले. ‘कोविड-१९’ महामारीमुळे हा पुरस्कार वितरण सोहळा पोन्ननी, केरळ येथे आयोजित केला होता.

पुरस्कार समारंभाची सुरुवात वनराई फाउंडेशन, नागपूरचे सचिव निलेश खांडेकर यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी आपल्या भाषणातून पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया आणि डॉ. गिरीश गांधी यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. 

Leave A Reply

Translate »