लाईटहाऊस फाउंडेशनच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाजातील १०,००० हून अधिक तरुणांना मिळाला रोजगार

पुणे : शहर परिसरात राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाजातील तब्बल १०,००० हून अधिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देत, शहरातील लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनने त्यांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश आणला आहे. शुक्रवारी, दि २४ फेब्रुवारी रोजी बंडगार्डन रस्ता येथील रेसिडेन्सी क्लब याठिकाणी आयोजित ‘कनेक्टिंग पाथवेज’ या कार्यक्रमात संघटनेच्या काही प्रशिक्षनार्थिनी आपली यशोगाथा सांगितली. पुणे महानगर पालिका आणि पिंपरी- चिंचवड महापालिका यांच्या सहकार्याने गेली पाच वर्षे लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन हे पुणे व पिंपरी- चिंचवड शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, कमी उत्पन्न गटातील तरुणांना मोफत स्वरूपात कौशल्य विकासाच्या विविध अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देत आहे.

यामाध्यमातून तरुणांमधील कौशल्य विकासाला चालना देत, त्यांच्यासाठी रोजगाराचे नवे पर्याय उपलब्ध करण्याचा प्रयत्न संघटनेतर्फे केला जात आहे. संघटनेचे सध्या पुणे शहरात १३ तर पिंपरी–चिंचवड परिसरात २ प्रशिक्षण केंद्रे आहेत. याबाबत लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनच्या संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रुची माथूर म्हणाल्या, “ आतापर्यंत संघटनेकडून विविध कौशल्यांचे प्रशिक्षण घेतलेल्या तब्बल ११,८९५ तरुणांना यशस्वीपणे रोजगार मिळाला आहे. यामध्ये महिला(५६ टक्के), पुरुष (४३ टक्के) आणि इतर (१ टक्के) यांचा समावेश आहे. रोजगार मिळालेल्या तरुणांपैकी सर्वाधिक वेतन हे ७०,००० प्रतिमहिना तर किमान वेतन हे १०,५१० प्रतिमहिना इतके आहे. यामध्ये १२ वी उत्तीर्ण तरुणांचे प्रमाण ५४ टक्के, पदवीधर तरुणांचे प्रमाण २७ टक्के तर १० वी उत्तीर्ण तरुणांचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी इतके आहे.

किरकोळ माल, आरोग्यसेवा, उत्पादननिर्मिती, सौंदर्य, खाद्यपदार्थ अशा विविध क्षेत्रात हे प्रशिक्षणार्थी कार्यरत आहेत. अमेझॉन, डीमार्ट, एचडीएफसी डाटा प्रोसेसिंग सेंटर, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स , युरेका फोर्ब्स, इन्फोसिस, टीसीएस अशा नामांकित कंपन्यांमध्येही संघटनेचे प्रशिक्षणार्थी काम करत आहेत. केस स्टडीज :मृणाल राजीव बडदे : २३ वर्षीय मृणालचे वडील रिक्षा चालक आहेत. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने, भविष्यात नेमके कशामध्ये करिअर करायचे? असा प्रश्न मृणालला होता. तिने कोविड-१९ च्या काळात बिबवेवाडी परिसरातील लाईटहाऊस केंद्रात प्रवेश घेतला. याठिकाणी तिने घेतलेल्या संवादकौशल्य प्रशिक्षणाचा तिला बराच फायदा झाला. सध्या मृणाल एका नामांकित आयटी कंपनीत तांत्रिक विश्लेषक म्हणून काम करत असून, तिचे वेतन ४१,००० प्रतिमहिना इतके आहे.

प्रज्ञा राजेंद्र नागपूरकर : २२ वर्षीय प्रज्ञा ही जनता वसाहत झोपडपट्टी येथे राहते. आई-वडील आणि दोन मोठ्या बहिणी असे तिचे कुटुंब आहे. तिचे वडील सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेल्या प्रज्ञाने वाणिज्य विषयात पदवी तर मिळविली, पण त्यापुढील उच्च शिक्षण घेणे परवडणारे नव्हते. मात्र इच्छाशक्ती असेल, तर प्रत्येक अडचणीवर मात करता येते, हे प्रज्ञाच्या प्रवासावरून लक्षात येते. तिने लाईटहाऊस फाउंडेशनबाबत माहिती मिळाल्यानंतर सप्टेंबर २०२२ मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून प्रवेश घेतला. याठिकाणी तिने फाउंडेशन अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर फायनान्शियल अकाउंटिंग अभ्यासक्रम पूर्ण केला. लाईटहाऊस येथील टीमच्या सहकार्याने तिने बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळविण्याच्यादृष्टीने मुलाखतीची तयारी केली. तिच्या या मेहनतीला चांगले यशही मिळाले. एका मोठ्या आयटी कंपनीत अकाउंट एक्झिक्युटिव्ह या पदावर तिला नोकरी मिळाली आहे.

निकिता लिंबाजी कांबळे : जनता वसाहत झोपडपट्टी परिसरातील २२ वर्षीय निकिता ही एक फुल स्टॅक डेव्हलपर आहे. इथपर्यंत पोहोचण्याच्या प्रवासात निकिताने अनेक अडचणींचा सामना केला, मात्र आपल्या स्वप्नाची कास तिने सोडली नाही. झील महाविद्यालयातून अभियांत्रिकीमध्ये पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीसाठी निकिताला बऱ्याच खस्ता खाव्या लागल्या. निकिताने लाईटहाऊस येथे फुल स्टॅक डेव्हलपर अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. याठिकाणी तिला अनेक महत्वपूर्ण गोष्टी शिकायला मिळाल्या, यामध्ये सर्वात महत्वाचे होते ते निर्णयक्षमता, संवाद कौशल्य, बौद्धिक आणि भावनिक बुध्यांक. तिने आपल्या मेहनतीच्या जोरावर एका आयटी सर्व्हिस मॅनेजमेंट कंपनीत नोकरी मिळविली अगदी १५,००० रुपयांपासून सुरवात करत, आज निकिता ३०,००० रुपये प्रतिमहिना इतके वेतन मिळवित आहे.

रेहान अबुबकर मणियार : १८ वर्षीय रेहान सध्या वाणिज्य विषयात पदवीचे शिक्षण घेत आहे. वडिलांचा भंगाराचा व्यवसाय असून, त्यावर संपूर्ण कुटुंब अवलंबून आहे. तसेच रेहान चे दोन लहान भाऊ देखील शिक्षण घेत आहेत. औंध येथील लाईटहाऊस केंद्राबाबत माहिती मिळाल्यानंतर रेहानने त्याठिकाणी प्रवेश घेतला. याठिकाणी दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणामुळे रेहानला त्याच्यामध्ये असलेल्या कौशल्यांची जाणीव झाली आणि त्याचा आत्मविश्वास वाढला. डिजिटल सक्षमता कार्यक्रमामुळे त्याला अनेक गोष्टींची माहिती मिळाली. सध्या तो एका बिझिनेस समुपदेशन कंपनीत बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत असून, प्रतिमहिना १२,००० रुपये कमावतो. त्याचबरोबर केंद्रात तो तांत्रिक कौशल्य विकास अभ्यासक्रमाचे प्रशिक्षणदेखील घेत आहे. भविष्यात सीए बनण्याचे त्याचे स्वप्न आहे. त्यासाठी तो बरीच मेहनत घेत आहे.

Leave A Reply

Translate »