हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृतीगौरव पुरस्कार खा. शरदचंद्रजी पवार साहेबांना जाहीर

पुणे, मंडई विद्यापीठ कट्ट्यातर्फे दिला जाणारा हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृतीगौरव सन्मान पुरस्कार यंदाच्या वर्षी खा. शरदचंद्रजी पवार साहेबांना जाहीर करण्यात आला आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुणे उपशहर प्रमुख व मंडई विद्यापीठ कट्ट्याचे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे यांच्या शिष्ठमंडळाने मुंबईतील सिल्वर ओक येथे खा. पवार साहेबांची भेट घेतली होती त्यावेळी खा. पवार यांनी हा सन्मान पुरस्कार स्विकारत असल्याचे जाहीर केले. फेब्रुवारी महिन्यात पुरस्कार सोहळ्याची तारीख जाहीर करण्यात येणार असून कोरोनाचे शासकीय नियम पाळून पुण्यात पुरस्कार सोहळा पार पडणार असल्याची माहिती मालुसरे यांनी दिली.


यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देत खा. पवार साहेब म्हणाले की, राजकारणापलीकडे जाऊन अनेक कठीण काळातही आमची मैत्री टिकली. बाळासाहेबांच्या नावाने मिळणारा पुरस्कार हा माझ्यासाठी घट्ट मैत्रीची आठवण करुन देणारा असून हा पुरस्कार स्विकार करत असल्याचे जाहीर केले.


यंदा पुरस्काराचे दुसरे वर्ष असून मागील वर्षी वैद्यकीय क्षेत्रातील पितामह रुबी हॉलचे डॉ. ग्रॅंट यांना प्रदान केला होता. एक लक्ष रुपये, स्मृतीचिन्ह, मानपत्र, भगवा फेटा, भगवी शाल, पेन, फळाची पाटी असे हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृतीगौरव पुरस्काराचे स्वरूप आहे. 


बाळासाहेब मालुसरे म्हणाले की, राजकीय मतभिन्नतेच्या पलीकडे असलेले मैत्र जपण्याची प्रेरणा खा. शरदचंद्र पवारसाहेब आणि स्व. बाळासाहेब ठाकरे आहेत. म्हणून मंडई विद्यापीठ कट्टा आणि पुण्यातील समस्त शिवसैनिकांच्यावतीने हा सन्मान करण्यात येणार आहे. पवारसाहेबांचा मागील सहा दशकांचा अभूतपूर्व राजकीय आणि सामाजिक प्रवास आम्हा कार्यकर्त्यांसाठी प्रचंड उर्जादायी आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात अनेक वर्ष आम्ही मंडई विद्यापीठ कट्टा हा उपक्रम चालवित आहोत. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रिडा, वकीली, पोलीस वैद्यकीय विभाग अशा अनेक क्षेत्रातील तीन हजारांहून अधिक मान्यवरांनी या कट्ट्यावर मुक्त संवाद साधला आहे. साहेबांनी हा पुरस्कार स्विकारल्यामुळे मंडई विद्यापीठ कट्ट्यावरील विचारमंथनाला चालना मिळणार असून खा. पवारसाहेब यावेळी शिवसैनिकांना बहुमोल मार्गदर्शन करणार आहेत. पवारसाहेबांनी नुकतेच ८२ वर्षात पदार्पण केले त्याबद्दल मालुसरे यांनी त्यांचे शतायुषी व्हा म्हणत मन:पुर्वक शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Translate »