जगात शांतता निर्माण होण्यासाठी पत्रकारांनी ‘पीस जर्नलिझम’च्या तत्त्वांचा अंगीकार करावा

१० व्या जागतिक संसदेत  ‘रोल ऑफ मीडिया इन एस्टॅब्लिशमेंट ऑफ पीस’ या परिसंवादात माध्यम तज्ज्ञांची भूमिका

पुणे :” युद्धजन्य किंवा ताणतणावाच्या परिस्थितीचे वार्तांकन करताना परिस्थिती चिघळणार नाही, याची काळजी पत्रकारांनी घेणे आवश्यक आहे. संवेदनशील परिस्थिती हाताळताना, त्यातून चुकीची माहिती समाजात पसरण्याची शक्यता असते. अशावेळी विचारपूर्वक वार्तांकन करणे गरजेचे आहे. तसेच पत्रकारिता करताना एका विचारधारेची बाजू घेऊन, एकांगी वृत्तांकन टाळावे.  पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्याला समाजात आणि देशांमध्ये शांतता निर्माण करायची झाल्यास, पीस जर्नलिझमची मूल्ये तत्त्वे पत्रकारांना आत्मसात करावी लागेल.” असे मत देशातील विविध प्रसारमाध्यमांध्ये काम करणारे पत्रकार आणि माध्यमतज्ज्ञांनी मांडले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने विज्ञान, धर्म/अध्यात्म आणि तत्त्वज्ञानावर आधारित १० व्या जागतिक संसदेत दुसऱ्या दिवशी ‘रोल ऑफ मीडिया इन एस्टॅब्लिशमेंट ऑफ पीस’ या विषयावर परिसंवाद रंगला. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुब्रतो रॉय, प्रतिभा चंद्रन, मोहम्मद वजीउद्दिन, मुनिश शर्मा,  शेफाली वैद्य, डॉ. उज्वला बर्वे , विनायक प्रभू आणि माध्यमतज्ज्ञ डॉ.मुकेश शर्मा यांनी सहभाग घेतला. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड अध्यक्षस्थानी होते.

प्रतिभा चंद्रन म्हणाल्या की, युद्धजन्य किंवा तणाव असणाऱ्या ठिकाणी वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांची मनस्थिती समजून घेण्याची आवश्यकता आहे. आजच्या प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना काम करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र, तरीही पत्रकार आपले काम चोखपणे करतात.  मुंबईवरील हल्ला किंवा बदलापूर येथील घटना असेल, तेथे वार्तांकन करतांना अशांततेची परिस्थिती निर्माण होणार नाही, याची अनेकांनी काळजी घेतलेली असते. अशा घटनांचे रिपोर्टिंग करतांना, येथील घटना प्रत्यक्ष अनुभवताना अनेक पत्रकारांच्या मनामध्ये स्वतःशीच भांडणाची परिस्थिती असते. त्याचाही कुठेतरी विचार व्हावा, अशी अपेक्षा चंद्रन यांनी व्यक्त केली

शेफाली वैद्य म्हणाल्या की, वृत्तवाहिन्या किंवा वृत्तपत्रांमध्ये छापून येणाऱ्या नकारात्मक बातम्या पाहता आपण पत्रकारितेची मूल्ये हरवली आहेत का, असे वाटत आहे. त्यामुळे समाजातील अनेक व्यक्तींमध्ये नकारात्मकता पसरत आहे. आजची प्रसारमाध्यमे  निष्पक्ष नसून, ते कोणत्यातरी विचारधारेची बाजू घेऊन काम करीत असल्याचे लक्षात येते. त्यामुळे पत्रकारितेत येणाऱ्या युवा पिढीने पत्रकारितेचे मूल्य पाळत, निष्पक्ष राहून काम करण्यासाठी प्रेरणा घ्यावी. युद्ध किंवा ताणतणाव निर्माण झालेल्या घटनेचे वार्तांकन करतांना, पत्रकारांनी ते प्रकरण अजून चिघळणार नाही, याची काळजी घेण्याची नितांत गरज आहे. आपल्याला समाजामध्ये सर्वांना एकसंध बांधून ठेवणाऱ्या पत्रकारितेची आवश्यकता असून, दोन गटांत दुरावा निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. पत्रकारिता करतांना पत्रकारांनी पीस जर्नालिझम मूल्ये आत्मसात केल्यास, शांतता निर्माण होण्यास मदत होईल.

डॉ. उज्वला बर्वे म्हणाल्या की, आपल्याला शांततेची व्याख्या विस्ताराने समजावी लागेल. सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन प्रकारच्या शांतता आहेत. प्रसारमाध्यमांनी सकारात्मक शांततेचा विचार करीत न्याय, समानता, एकात्मता, प्रेम, सहकार्य अशा मूल्यांचा विचार करण्याची आवश्यकता आहे. पत्रकार म्हणून अशांतता किंवा तणाव असलेल्या परिसरात काम करताना खूप काळजी घेण्याची गरज आहे. तेथे जबाबदारी आणि विचारपूर्वक काम करावे लागते. नव्याने पत्रकारितेत येणाऱ्यांनी पीस जर्नलिझमची व्याख्या लक्षात घेऊन, काम केल्यास खऱ्या अर्थानं जगात शांतता नांदण्याचे काम होईल.

डॉ. मुकेश शर्मा आज सर्वांच्या हातात स्मार्टफोन असून, त्याद्वारे  सर्व प्रकारच्या माहितीचा मोठ्या प्रमाणावर माहितीचा प्रचार-प्रसार होत आहे. स्मार्टफोन म्हणजेच बातम्या, मनोरंजन, माहितीचा खजिना झाला आहे. आपल्या स्मार्टफोनवर येणारी माहिती खरी आहे की खोटी, याची पडताळणी केल्याशिवाय ती शेकडो स्मार्टफोनवर फॉरवर्ड केली जात आहे. सोशल मीडियावर क्षणात खोटे चित्र किंवा व्हिडिओ व्हायरल होऊन, समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे समाजात अशांतता पसरून आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे आपल्याला विचारपूर्वक आणि हुशारीने सोशल मीडियाचा वापर करायचा आहे.

ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद वजीउद्दिन म्हणाले की, न्याय आणि शांतता या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जुळलेल्या आहेत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला न्याय मिळत नसल्यास, शांतता कशी प्रस्थापित होईल, याचा आपण विचार करायला हवा. अशा परिस्थितीत न्यायदानाची प्रक्रिया ही पारदर्शक आणि जलदगतीने व्हायला हवे. त्याद्वारे शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल. प्रसारमाध्यमांची मालकी ही उद्योजकांकडे जात आहे. हे तातडीने थांबण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी काही कायदा करता आल्यास, त्याचा विचार करावा.

विनायक प्रभू म्हणाले,  पत्रकारितेचा वारसा आपल्याला देवर्षी नारद यांच्याकडून मिळाला आहे. त्यामुळे आपल्याला वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि डिजीटल क्षेत्राच्या माध्यमातून समाजात शांतता पसरवण्याचा दृष्टीने उत्तम काम करायचे आहे. पत्रकारिता करतांना कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे हेही ठरवता आले पाहिजे. त्याचवेळी चांगल्या गोष्टींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे.
मुनीष शर्मा यांनी त्यांच्या पत्रकारितेतील अनुभवांद्वारे उपस्थितांना शांततेचे महत्त्व विशद केले. यावेळी त्यांनी क्राईम रीपोर्टिंग; तसेच जम्मू काश्मीर येथे काम करतांना आलेल्या अनुभवांचे कथन केले.

 पुण्याचे बिशप जॉन रॉड्रिग्स यांनी व्हॅटिकन सिटी येथील मुख्य पोप यांचा शांतता संदेश वाचून दाखविला. त्यानंतर या संदेशाची प्रत डॉ. विश्वनाथ कराड यांना सुपूर्त केली.

प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करीत, पत्रकारांनी सामाजिक दृष्टिकोन समोर ठेऊन पत्रकारिता केल्यास, जगात शांतता निर्माण होण्यास नक्कीच मदत होणार आहे,

प्रा. धीरज सिंह यांनी सूत्रसंचालन केले.

Leave A Reply

Translate »