पुणे नेत्रतज्ञ संघटनेच्या वतीने ३९ व्या नेत्रदान पंधरवडयानिमित्त विशेष कार्यक्रम

नेत्रदान जनजागृतीपर गायन व नृत्य तसेच लघुपटाचे प्रदर्शन

पुणे : पुणे नेत्रतज्ञ संघटनेच्या वतीने ३९ व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रम सुरू असून याचा समारोप रविवार, दिनांक ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळेतील गणेश सभागृहात होणार आहे, अशी माहिती संघटनेच्या अध्यक्ष डॉ. राधिका परांजपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला डॉ. अश्विनी मिसाळ (सचिव), डॉ वृषाली वरद (खजिनदार ) व डॉ. समीर दातार (संयोजक) उपस्थित होते.

डॉ. राधिका परांजपे म्हणाल्या, ‘नेत्रदान जणू जीवन प्रदान’ हा संदेश आम्ही या माध्यमातून देत आहोत. प्रमुख पाहुणे म्हणून एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमामध्ये नेत्रदान केलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांचे मनोगत, नेत्रदानातून दृष्टी प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांचे मनोगत, दृष्टिहीन व्यक्तींकरिता केलेल्या उपक्रमांची ओळख आदी विषयांचा समावेश आहे. तसेच, नेत्रदान जनजागृती पर डॉ. भक्ती दातार यांचे गायन व अमित गोडबोले यांचे नृत्य सादरीकरण होणार आहे. नेत्रदान जनजागृतीसाठी डॉ. समीर दातार यांनी दिग्दर्शित केलेल्या लघुपटाचे प्रक्षेपण होणार असून, तो युट्युब चॅनेल वरती सर्वांकरिता खुला केला जाणार आहे. नेत्रदान जनजागृती साठी घेतलेल्या चित्रकला स्पधेर्चा बक्षीस समारंभ देखील याठिकाणी होणार आहे.

नेत्रदानाविषयी जनजागृती करण्यासाठी, लोकांना यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि समाजात नेत्रदानाची संस्कृती निर्माण करण्यासाठी संघटना दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करते. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी शाळांमधे नेत्रदानाच्या विषयावर आधारित चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. युवा पिढीला नेत्रदानाचे महत्त्व शिकवणे हा या स्पर्धेमागील उद्देश होता. पुणे नेत्रतज्ञ संघटनेतील तज्ञ डॉ. समीर दातार व डॉ. राहुल देशपांडे हे रेडिओ वाहिन्यांवरील चर्चासत्रात सहभागी झाले होते. या चर्चासत्रात नेत्रदानाची आवश्यकता, नेत्रदानाची प्रक्रिया तसेच नेत्रदानाबाबत असलेले गैरसमज याविषयी माहिती देण्यात आली.

पंधरवड्याचा एक भाग म्हणून ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या परांजपे आॅप्टिकल्स प्रायोजित, स्वरसंगिनी यांच्या गाण्याच्या कार्यक्रमामध्ये, ९० लोकांनी मरणोत्तर नेत्रदानाची प्रतिज्ञा घेतली व त्यांना नेत्र संघटनेच्या तज्ञ डॉ. समीर दातार ह्यांनी नेत्रदानाबद्दल पूर्ण माहितीही दिली. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात ‘कॉर्नीया प्रत्यारोपण’ विषयावर वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली. ही स्पर्धा विद्यार्थ्यांना नेत्रदान आणि कॉर्नीयल प्रत्यारोपणाच्या महत्वाच्या मुद्यांवर विचार करण्यास आणि त्यावर चर्चा करण्यास प्रवृत्त करणारी ठरली. तरी सर्व सार्वजनिक संस्था, शाळा, महाविद्यालये आणि समाजातील सर्व घटकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे. एकत्रितपणे आपण जागरुकतेची लाट नक्कीच निर्माण करू शकतो, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Translate »