गणेश विसर्जन मिरवणूक रद्द करुन उत्सवात शिक्षण आणि आरोग्य जागर

गुरुवार पेठेतील हिंद युवक मित्र मंडळाचा पुढाकार ; तब्बल १२० जणांना शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना कार्ड मोफत वाटप

पुणे : गणेशोत्सवात मिरवणुकांवर होणार खर्च टाळत गणेश विसर्जन मिरवणूक रद्द करुन गुरुवार पेठेतील हिंद युवक मित्र मंडळाने शैक्षणिक आणि वैद्यकीय उपक्रम आयोजित केले आहेत. मिरवणुकीत होणारा खर्च हा गरजूंना शैक्षणिक मदतीसाठी व आरोग्यविषयक जनजागृतीसाठी व्हावा, याउद्देशाने १० दिवस विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील अनेक कुटुंबांना आरोग्यविषयक खर्च परवडणारा नसतो, त्यामुळे तब्बल १२० जणांना मोफत शहरी गरीब वैदकीय सहाय्य योजना मोफत कार्ड देण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष रोहन शिंदे आणि उपाध्यक्ष हरी मेमाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला मनोज शेलार, गौरव मळेकर, संग्राम साळुंके, रोहित शिंदे, अथर्व इंदलकर आदी उपस्थित होते.

मंडळाचे यंदा ५३ वे वर्ष आहे. गणेशोत्सवात शैक्षणिक, वैद्यकीय आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यामध्ये रविवार, दि. ८ सप्टेंबर रोजी आरोग्य व रक्तदान शिबीर होणार आहे. शिबीरात रक्त तपासणी, मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मा वाटप, मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया आणि महिलांसाठी मोफत स्तन कर्करोग तपासणी देखील करण्यात येईल. याशिवाय सोमवार, दि. ९ सप्टेंबर रोजी देवदासी महिलांच्या मुलांना शालेय साहित्याचे वाटप विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. समाजातील अनेक कुटुंबांना आरोग्यविषयक खर्च परवडणारा नसतो, त्यामुळे त्यांच्यासाठी शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना मोफत कार्ड यावर्षी देण्यात येत आहे.

सांस्कृतिक महोत्सवात मंगळवार, दि. १० सप्टेंबर रोजी धर्मवीर संभाजी दलातर्फे बरची व लेझीम नृत्य सादरीकरण, बुधवार, दि. ११ सप्टेंबर रोजी श्री स्वामी ओम मल्हारी सेवा भजनी मंडळातर्फे भजनसेवा, गुरुवार, दि. १२ सप्टेंबर रोजी गर्जना सह्याद्रीची हा धर्म, परंपरा, संस्कृती जपणारा कार्यक्रम, शुक्रवार, दि. १३ सप्टेंबर रोजी आदिमायाशक्तीचा गोंधळ, शनिवार, दि. १४ सप्टेंबर रोजी बापू चव्हाण निर्मीत गजर महाराष्ट्राचा आणि रविवार, दि. १५ सप्टेंबर रोजी बालमेळावा व पाणीपुरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रम विनामूल्य खुले असून गणेशभक्तींनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Translate »