आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या पुढाकाराने बालगंधर्व रंगमंदिरातील प्रलंबित कामांना मिळणार गती

अभिनेते प्रशांत दामले यांच्या उपस्थितीत महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांशी एकत्रित चर्चा करीत शिरोळे यांनी जाणून घेतल्या समस्या

पुणे : पुणे शहराचा सांस्कृतिक चेहरा असलेले बालगंधर्व रंगमंदिर हे शहराचे भूषण असून या ठिकाणी कलाकारांची आणि रसिक प्रेक्षकांची कोणतीही गैरसोयी होता कामा नये, अशा स्पष्ट सूचना छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पुणे महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. शिरोळे यांनी नुकतीच बालगंधर्व रंगमंदिराला भेट दिली.

यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, पुणे महानगर पालिकेच्या सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त सुनील बल्लाळ, विद्युत विभागाचे उप अभियंता जयदीप अडसूळ, कनिष्ठ अभियंता मंगल मारतळेकर, भाग्यश्री देशपांडे हे देखील उपस्थित होते. बालगंधर्व रंगमंदिरात अनेक प्रलंबित प्रश्नांची यादीच यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी वाचून दाखविल्यानंतर हे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना शिरोळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, माझ्या छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघात बालगंधर्व रंगमंदिर येते याचा खरेतर आमदार म्हणून मला अभिमान आहे. नूतनीकरणानंतर देखील येथे अनेक समस्या आहेत, हे लक्षात आल्यानंतर आज मी स्वत: बालगंधर्व रंगमंदिर येथे भेट देऊन पाहणी केली. पार्किंग, स्वच्छतागृह, एसी व्यवस्था अशा अनेक तक्रारी येथे आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना केल्या असून येत्या आठ ते दहा दिवसात त्यावर काम होईल.

प्रशांत दामले म्हणाले, भाविनिकदृष्ट्या बालगंधर्व रंगमंदिर आम्हा सर्व कलाकारांच्या मनाच्या जवळ असून नुकत्याच झालेल्या नूतनीकरणानंतर देखील येथे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यामध्ये प्रामुख्याने पार्किग सुविधा, स्टेज व सभागृह येथील एसी व्यवस्था, स्वच्छतागृह, कॅन्टीन व लॉजिंग व्यवस्था, आवश्यक मनुष्यबळाची तरतूद, आवश्यक साउंड सुविधा, अद्ययावत मेक अप रूम्स या प्रमुख समस्या आहेत. वारंवार कलाकार या सर्वांबाबत तक्रारी करत असतात. मात्र महानगरपालिकेचे अधिकारी त्याकडे काना डोळा करीत आले आहेत. आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि विभागाचे उपायुक्त यांना नाटक आणि सांस्कृतिक चळवळीविषयी कळकळ आहे त्यामुळे आता किमान ही प्रलंबित कामे मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नूतनीकरण करताना बाकी खर्च होत आहेतच मात्र, वर नमूद बाबी यांवर का खर्च होत नाही असा सवाल दामले यांनी उपस्थित केला. पुणे महानगरपालिकेने पुण्यातील नाट्यगृहांमधील व्यवस्थेच्या खचार्साठी किमान १० ते २० कोटी रुपयांची एफडी करून त्याच्या व्याजावर ही सर्व व्यवस्था उभी करावी, अशी सूचनाही दामले यांनी केली.

सुनील बल्लाळ यांनी या सर्व समस्या ऐकून घेत येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये निविदा काढून कामाला सुरुवात करू असे आश्वासन दिले आहे. यामध्ये प्रामुख्यान एस व्यवस्था, स्वच्छतागृहांची स्वच्छता पार्किंग व्यव्यस्था आणि आवश्यक मनुष्यबळाची तरतूद करण्याच्या सूचनाही त्यांनी इतर अधिकाऱ्यांना दिल्या.

Leave A Reply

Translate »