महिला आणि एलजीबीटीक्यू (LGBTQ) समुदायाच्या उद्योजकांची परिषद उत्साहात संपन्न

सर्वसामान्यांपेक्षा “एलजीबीटीक्यू” समुदायाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. भीती, लाज, स्वत:च्या लिंगभावाविषयीची अस्वस्थता, सामाजिक दबाव, मानसिक ताणतणाव, आत्महत्येचे विचार, सामाजिक कलंक असल्याची भावना घेऊन जगत असताना त्यांना अनेकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये सक्षम उद्योजक घडविण्यासाठी उद्योजकता परिषद आयोजित करण्यात आली. – ग्लोबल सिनर्जीझर्सच्या संस्थापिका रुपाली पाटील

पुणे – महिला आणि एलजीबीटीक्यू उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या व्यावसायिक अनुभवांचे आदान प्रदान व्हावे, महिला उद्योजकांच्या विविध समस्यांचे निरसन व्हावे, त्यांच्या उद्योगाला चालना मिळावी या उद्देशाने ग्लोबल सिनर्जीझर्स संस्थेने “ईनाबल द शक्ती” या एक दिवसीय परिषदेचे आयोजन केले होते. लघु उद्योग आणि ग्रामीण भागातील लघु उद्योगांत महिलांचा मोठ्या प्रमाणावरील सहभाग लक्षात घेता, कौशल्य प्राप्त कर्मचार्‍यांची आवश्यकता लक्षात घेऊन महिला आणि एलजीबीटीक्यू उद्यमींना प्रशिक्षण देण्याचे काम ग्लोबल सिनर्जीझर्सच्या वतीने करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून

संस्थेच्या वतीने महिला आणि

एलजीबीटीक्यू समुदायासाठी “ईनाबल द शक्ती” हि उद्योजकांना सक्षम करणारी परिषद नुकतीच पुण्यात पार पडली.यावेळी उद्योजकांची एक स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये महिला गटातील विजेती- ओम्नीऑन कंपनीच्या नीता दोशी, उपविजेत्या माय प्लॅन8च्या निधी मेहरा, द्वितीय उपविजेत्या ऍग्रीविजयच्या शोभा चंचलानी झाल्या. तर 

 एलजीबीटीक्यू नेतृत्वाखालील स्टार्टअप मध्ये न्यू भारत कंपनीचा मोहम्मद नाझिम विजेता झाला. रेनबो आर्टिस्टचे रूपेश उपविजेता झाले. आर्टिस्ट ऍबॉडचे रोहन द्वितीय उपविजेता झाले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. चंद्रिका परमार, कर्नल प्रमोद दहितुले उपस्थित होते. यावेळी ग्लोबल सिनर्जीझर्सच्या 

संस्थापिका रुपाली पाटील, विनोद राऊत, सुनंदा शिव्हरे उपस्थित होत्या.या परिषदेत महिला व 

 एलजीबीटीक्यू समुहातील उद्योजकांसमोरील आव्हाने, व्यक्तिमत्व विकास, देशातील महिला उद्योग धोरण,राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना, महिलांसाठी विविध क्षेत्रातील उपलब्ध असणाऱ्या संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या परिषदेमध्ये मार्गदर्शनपर व्याख्यानांसह इंडस्ट्रीच्या गरजा, प्रशिक्षण, कौशल्य निर्माण, घरगुती उद्योगांसाठी आवश्यक कौशल्ये, संपर्क यंत्रणा, भांडवल उभारणीतील पर्याय, महिला उद्योजकांसाठी असलेले प्रकल्प, डिजिटल मार्केटिंग या संकल्पनांवर मांडणी करण्यात आली. उद्योजक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महिलांसाठी उद्योगक्षेत्रातील संधी व कौशल्य याविषयी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन या परिषदेतंर्गत करण्यात आले. व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान, व्यवसायवाढीची कौशल्ये, व्यवसाय वृद्धीची तत्वे यासंदर्भात या परिषदेत माहिती देण्यात आली.प्रा. चंद्रिका परमार म्हणाल्या की, महिलांमध्ये उद्योजकता रुजल्याशिवाय घराघरांत उद्योजकता रुजणार नाही. कुटुंबातील एक स्त्री उद्योजक झाली तर उद्योजकतेचे संस्कार ती आपल्या कुटुंबावर करील. तिच्या उद्योजकीय संस्कारातून भावी पिढी उद्योजकीय होईल. उद्योगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारे सारे गुण तिला निसर्गाने बहालच केले आहेत. लग्न, मुले असे टप्पे महिलांच्या आयुष्यात येत असल्याने कॉर्पोरेट क्षेत्रात महिलांचे नेतृत्व खूप कमी आहे,  शिक्षणानंतर मुली नोकरीला लागतात. परंतु, लग्न, मुले असे टप्पे त्यांच्या आयुष्यात आल्याने बहुतांशी महिला कौटुंबिक कारणांनी माघार घेतात. त्यामुळे महिलांचे नेतृत्व वरच्या पातळीवर खूपच कमी आहे. स्त्री ही सृष्टीची शक्ती मानली जाते, म्हणजेच मानव जातीचे अस्तित्व स्त्रीपासून आहे असे मानले जाते. महिला सक्षमीकरणाचा अर्थ या निर्मितीच्या शक्तीचा विकास आणि परिष्कृत करणे आणि तिला सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, विचार स्वातंत्र्य, श्रद्धा, धर्म आणि उपासना, संधीची समानता प्रदान करणे आहे.ग्लोबल सिनर्जीझर्सच्या संस्थापिका रुपाली पाटील म्हणाल्या की, महिलांची आणि 

 एलजीबीटीक्यू समुदायाची सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारून त्यांना रोजगार, शिक्षण, आर्थिक प्रगतीच्या समान संधी मिळाल्या तरच त्यांना सामाजिक स्वातंत्र्य आणि प्रगती मिळेल. आजच्या समाजात अनेक भारतीय महिला राष्ट्रपती, पंतप्रधान, प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, वकील इत्यादी झाल्या आहेत, पण तरीही आजही अनेक महिलांना सहकार्य आणि मदतीची गरज आहे. त्यांना अजूनही शिक्षण, आणि मुक्तपणे काम करण्यासाठी, सुरक्षित प्रवास, सुरक्षित काम आणि सामाजिक स्वातंत्र्यासाठी अधिक समर्थनाची गरज आहे. महिला सक्षमीकरणाचे हे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे कारण भारताची सामाजिक-आर्थिक प्रगती ही महिलांच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीवर अवलंबून आहे. लोकांची विचारसरणी बदलत असली तरी या दिशेने अजून प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी ग्लोबल सिनर्जीझर्स संस्था काम करत आहे. 

Leave A Reply

Translate »